उरण : खारकोपर ते उरण रेल्वे मार्गासाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनीच्या बदल्यात जासई परिसरातील शेतकऱ्यांना सिडकोने गुरुवारी
साडेबारा टक्के भूखंडाच्या इरादा पत्राचे वाटप केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेकदा आश्वासन देऊनही जासईच्या शेतकऱ्यांना साडेबारा टक्केचे वाटप न केल्याने उरण नेरुळ मार्गावरील गव्हाण स्थानकाचे काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत सिडकोच्या मुख्य भूमी व भूमापन अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी भूखंड लवकरात लवकर देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते.

हेही वाचा : उरण – खारकोपर रेल्वे मार्गाच्या विलंबाविरोधात काँग्रेसचे गाजर दाखवा आंदोलन

त्यानुसार सिडको कार्यालयात विकसित साडेबारा टक्के भूखंडाच्या इरादा पत्राचे वाटप करण्यात आले आहे. हे इरादा पत्र जासई ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष घरत यांच्या कडे देण्यात आले आहेत. त्यांनी याबद्दल सिडकोच्या भूमी आणि भूमापन अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. जासई ते गव्हाण मार्गासाठी जासई येथील ३७ शेतकऱ्यांच्या जमिनी २००५ ला संपादीत करण्यात आल्या आहेत. त्या मोबदल्यात दिले जाणारे ७० गुंठे साडेबारा टक्के भूखंड न दिल्याने जासई येथील शेतकऱ्यांनी ही भूमिका घेतली होती. यावेळी शेतकरी ही उपस्थित होते.

Story img Loader