उरण : अनेक दिवसांपासून वातावरणात गारठा वाढला असून समुद्रातील तापमानही कमी झाल्याने खोल समुद्रातील मासळीही गारठल्याने ती तळाला गेली आहे. त्यामुळे मासळीची ४० टक्केपेक्षा अधिक आवक घटली आहे. परिणामी मासळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे खवय्यांबरोबर मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले आहेत. या स्थितीत मासेमारीसाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.
प्रत्येक बदलत्या वातावरणाचा मासेमारी व्यवसायावर परिणाम होतो. त्यानुसार सध्या वातावरणातील गारव्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना आवश्यक त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांनी केलेला खर्चही निघत नसल्याने नुकसान सहन करावे लागत आहे यावर्षी थंडीचे प्रमाण वाढल्याने पुन्हा एकदा मच्छीमारांवर संकट आले आहे. खोल समुद्रातील मासेमारीच्या एका फेरीसाठी ३ ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र सध्या मासळीचे प्रमाण कमी झाल्याने मच्छीमारांना मिळणारी ८ ते १० टनांची मासळी आता ३ पेक्षा कमी टनांवर आली आहे. त्यामुळे यासाठी करण्यात आलेला खर्चही निघत नाही. ही स्थिती काही दिवस राहील अशी माहिती मच्छीमारांनी दिली आहे.
हेही वाचा : रिल्स बनविणे पनवेल महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना भोवले
विविध प्रजातींचे मासे मिळेनात
● समुद्रातील वाढते प्रदूषण आणि अनधिकृतपणे सुरू असलेल्या बेसुमार मासेमारीच्या परिणामी समुद्रात मिळणारे अनेक प्रकारचे मासे गायब होऊ लागले आहेत. पापलेट, सुरमई, घोळ आणि इतर अनेक प्रजातीचे मासे मिळेनासे झाले आहेत.
● कोलंबी प्रकारात टायनी १०० रुपयांवरून २००, चैनी २०० वरून ३५०, सफेद कोलंबी १५० वरून २५० रु.
● मांदेली आणि बोंबील हे सर्वसामान्य खवय्यांच्या पसंतीचे व परवडणारे मासेही महाग झाले आहेत. त्याचा परिणाम मासळीच्या दरवाढीवर झाला आहे.
हेही वाचा : उरण : वहाळ येथील डेब्रिज व्यवस्थापनासाठी समिती
● विविध प्रकारच्या मासळीच्या प्रजातीच्या संरक्षणासाठी शासनाने समुद्रातील लहान माशांच्या मासेमारीला बंदी घातली आहे. मात्र तरीही अशा प्रकारच्या लहान माशांची मासेमारी केली जात आहे.
वातावरणातील गारठ्यामुळे उष्णतेच्या शोधात मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. परिणामी मासळीची आवक घटली असून दर वाढले आहेत. मच्छीमारही आर्थिक संकटात सापडले आहेत.