उरण : शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातून क्रूड तेलाची गळती झाली आहे. त्यामुळे पिरवाडी मांगीन देवी परिसरात उग्रवास येत असून येथील शेतीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे भरतीची वेळ असल्याने नाल्यातून समुद्रात वाहून जाणाऱ्या तेलामुळे येथील मत्स्यजीवांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मांगीन देवी मंदिराला लागून असणाऱ्या नाल्यातून गळती झाली असून, या तेलाचा प्रचंड तवंग येथील नाल्यासह समुद्राच्या पाण्यावर पसरला आहे. तर प्रचंड प्रमाणात तेलाचा वास येथील परिसरामध्ये पसरला होता. तेल गळती झाल्याचे लक्षात येताच प्रकल्पाकडून नाल्यामार्फत समुद्रामध्ये मिसळणारे तेल थांबवण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला आहे.
हेही वाचा : VIDEO: कर्नाळा जवळ जेएसडब्ल्यू कंपनीच्या बसचा अपघात, १९ कामगार जखमी
तर किनाऱ्यावर आलेला तेलाचा जाड थर जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांसह सक्शन पंप, ड्रम, सक्शन व्हॅन घटनास्थळी कार्यरत झाल्या आहेत. दरम्यान येथील नाल्यातून बाहेर येणारे तेल येथील पिकट्या शेत जमिनीमध्ये जात असल्याने, शेत पिकाचे नुकसान होणार असल्याचा दावा येथील शेतकरी करत आहेत. तर समुद्राच्या पाण्यामध्ये तेल मिसळल्याने किनारी भागावरील मासे आणि तत्सम जीव धोक्यात आले आहेत. तर यावर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे. ओएनजीसी प्रकल्पामधून अशा प्रकारे अनेकदा तेल गळती झाली असून, घडलेल्या घटनांमधून आजवर पाच जणांचा जीव गेला आहे. यामध्ये एका स्थानिक नागरिक, तीन अग्निशमन दलाचे जवान आणि एका प्रकल्प व्यवस्थापकाचाही समावेश होता.