उरण : प्लास्टर ऑफ पॅरिस व शाडू मातीच्या गणेशमूर्तीपेक्षा महाग असून गणेशभक्तांकडून पर्यावरणस्नेही असलेल्या कागदी लगद्याच्या मूर्तींना अधिकची मागणी वाढली आहे. गणेशोत्सव काळात वाढत्या प्रदूषणाच्या समस्येत भर पडू लागली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक वर्षे साजरा केल्या जाणाऱ्या निसर्ग व पर्यावरणस्नेही उत्सवाची जागा आता पर्यावरणाचा नाश करणाऱ्या विविध वस्तूंनी घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने परंपरागत शाडू मातीच्या मूर्तीऐवजी सध्या पाण्यात न विरघळणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसपासून लाखो मूर्ती तयार केल्या जातात.
उरणच्या जासई येथील पवार यांच्या कारखान्यात वृत्तपत्राच्या कागदाच्या लगद्याच्या गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. मागील सत्तर वर्षांपासून या कारखान्यात केवळ पर्यावरणस्नेही शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत असले तरीही गणेशोत्सवात पर्यावरणाचा मुख्य उद्देश ठेवून व्यवसाय केला जात आहे, अशी माहिती मूर्तिकार मनोहर पवार यांनी दिली आहे.
वडिलांनी सुरू केलेल्या या व्यवसायात त्यांचे कुटुंबीय काम करीत आहेत. त्यांच्या कारखान्यात एक, दोन आणि तीन या आकाराच्या कागदाच्या लगद्याच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. मातीच्या मूर्तीपेक्षा दोन ते अडीच हजार रुपयांनी महाग तर दोन-तीन हजारांनी प्लास्टरच्या मूर्ती स्वस्त असतानाही सध्या गणेशभक्तांकडून कागदी लगद्याच्या मूर्तीची मागणी वाढली आहे. यामध्ये घरगुतीबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही या मूर्तींना मागणी आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्रात विसर्जन करून पाणी प्रदूषित करण्यापेक्षा शाडूच्या किंवा कागदी लगद्याच्या मूर्तीचे पूजन करून कृत्रिम तलावात विसर्जन करणे ही काळाची गरज आहे. पारंपरिक शाडूच्या मूर्तीऐवजी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा वापर तसेच सजावटीसाठी थर्माकोलचा वापर, घातक रासायनिक रंगांचा वापर करण्यात येतो. यामुळे जलप्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होत आहे.
हेही वाचा: ‘सेझ’च्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्या, सुनावणी करण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
मूर्ती वजनाने हलक्या
विसर्जनानंतर पाण्याचे प्रदूषण होत नसल्याने जनजागृती वाढल्याने या मूर्तींच्या मागणीत वाढ झाली असल्याचेही मूर्तिकारांचे म्हणणे आहे. या मूर्ती तयार करण्यासाठी कागद, पुठ्ठे, गम यांचा वापर केला जातो. सुरुवातीला मूर्तीसाठी साचा तयार करून त्यानंतर साच्यात या मूर्ती तयार केल्या जात आहेत. माती आणि प्लास्टरपेक्षा या मूर्ती तयार करण्यासाठी अधिक वेळ लागतो. मात्र या मूर्ती तयार झाल्यानंतर रंगकाम केल्यावर मूर्तीतील फरक सहसा ओळखता येत नाही.