उरण : बोरी येथे शुक्रवारी सकाळी १० वाजता लागलेली आग अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतरही शनिवारी चोवीस तास धूमसतेय. ही आग भीषण असल्याने ती विझविण्यासाठी ४० टँकर मधून ४ लाख लिटरपेक्षा अधिक पाण्याचा वापर करण्यात आला आहे. या आगीमुळे परिसरातील नागरिकांना धुरासह रात्रभर अंधाराचाही सामना करावा लागला आहे. आग लागलेल्या गोदामाच्या परिसरात थेट अग्निशमन वाहन जाऊ शकत नसल्याने आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीच्या छतावर चढत ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. तर शहरातील एका विहिरीतून तसेच जलवाहिनीतील पाण्याचा वापर करून ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या गोदामात रसायने असल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या आगीची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शुक्रवारी सकाळी शहरातील उरण – मोरा मार्गावरील बोरी परिसरातील अनधिकृत भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. मात्र या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. ती आटोक्यात आणण्यासाठी सिडको, ओएनजीसी व जेएनपीटी, वायु विद्युत केंद्र येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि वाहनांनी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. तर या आगीची धग परिसरातील नागरी वस्तीलाही बसली. आगीत शेजारील वस्ती आणि घरांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
हेही वाचा : पनवेल : करंजाडे वसाहतीसह नऊ गावांना ३० ऑक्टोबरला पाणीपुरवठा होणार नाही
भंगाराचे अनधिकृत गोदाम : उरण नगरपरिषदेच्या हद्दीत हे गोदाम मोडत आहे. या गोदामाला नगरपरिषदेची कोणतीही परवानगी नसल्याचे मुख्यधिकारी राहुल इंगळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या आगीच्या घटनेनंतर शहरातील अनधिकृत गोदामांची चौकशी करण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.