उरण : दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू होत आहे. यानिमित्ताने उरणच्या करंजा, मोरा तसेच ग्रामीण भागातील बंदरात तयारी सुरू झाली आहे. शासनाकडून १ जून ते ३१ जुलै दरम्यानची खोल समुद्रातील मासेमारीवरील दोन महिन्यांची बंदी कालावधी गुरुवारी १ ऑगस्टला संपणार आहे. त्यासाठी मच्छीमार नाखवा (बोटीचा मालक) दर्याला निघाला असून बंदरावर लगबग सुरू झाली आहे.

उरणमधील करंजा व मोरा बंदरांसह इतर बंदरांतील मच्छीमार एक ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या नव्या हंगामाच्या तयारीला लागले आहेत. दोन महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा एकदा खोल समुद्रातील मासेमारी सुरू होणार असल्याने खवय्यांची ताज्या मासळीची समस्या दूर होणार आहे. यासाठी दोन महिन्यांपासून उभ्या करण्यात आलेल्या बोटींची रंगरंगोटी, त्यावरील उपकरणे, इंजिनची डागडुजी, छिद्र पडलेल्या जाळीची दुरुस्ती तसेच बोटी समुद्रात नेऊन त्यांची तपासणी आदी कामे सुरू आहेत.

हेही वाचा : ‘नैना’तील रस्त्यांसाठी पुन्हा निविदा, तीन हजार ४७६ कोटींच्या निविदा जाहीर, पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने रस्ते बांधणीची कामे

मत्स्यव्यवसाय विभागाकडून पावसाळ्यात दरवर्षी १ जून ते ३१ जुलै या कालावधीकरिता खोल समुद्रात मासेमारीस बंदी घालण्यात येते. त्यामुळे या बंदी काळाचा पुनर्विचार करण्याची ही मागणी पुढे येत आहे. या कालावधीत करंजा बंदरात मासेमारी करणाऱ्या अनेक बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली होती.

हेही वाचा : नवी मुंबई: महायुतीत झोपडपट्टी पुनर्वसनावरून वाद, झोपु योजना गणेश नाईकांमुळेच रखडल्याचा आरोप

थकीत अनुदान

मासेमारीवर बंदी असल्याने दररोज मिळणाऱ्या ताज्या व मोठ्या मासळीची आवक कमी होते. त्यामुळे खवय्यांना शीतगृहात साठवून ठेवण्यात आलेल्या मासळीवर विसंबून राहावे लागते. दुसरीकडे सरकारने मच्छीमारांच्या डिझेलवरील लाखो रुपयांचे परतावे (अनुदान) थकीत असल्याची माहिती करंजा येथील मच्छीमारांनी दिली आहे. तर हा हंगाम तरी कोणतेही वादळी विघ्ने न येता सुरू व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.