उरण : स्थानिक पक्षी आणि खाद्याच्या शोधात येणाऱ्या परदेशी पक्ष्यांचे थवे उरणच्या पाणथळीवर जमा होऊ लागले आहेत. उरण रेल्वे स्थानक व शेवा गावा शेजारी समुद्राच्या भरतीच्या पाण्याने निर्माण झालेल्या पाणथळ्यावर दिसत आहेत. समुद्रातून खाडीत मासळी येण्याचे नैसर्गिक मार्ग मातीचा भराव करून बंद करण्यात आले असून त्यामुळे खाडीतील मासळीचे प्रमाण कमी झाल्याचा मासळी खाद्य असलेल्या हजारो पक्ष्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुसरीकडे पक्ष्यांचे अधिवास असलेली पाणथळेही नष्ट होत आहेत. याचाही परिणाम पक्ष्यांच्या जीवनावर होऊ लागला आहे. खाद्यासाठी पक्ष्यांची भ्रमंती वाढली आहे.
बहुतांशी पक्ष्यांचे खाद्य हे मासळी आहे. त्यामुळे समुद्र व खाडी किनाऱ्यावर पक्षी आपल्या खाद्याच्या शोधात हजारो किलोमीटरचे अंतर पार करून येतात. मात्र खाडीतील पाण्याचे प्रवाह बंद होत आहेत. त्याचप्रमाणे मासळीच्या प्रजनन चक्राची साखळी खंडीत केली जात आहे. याचा परिणाम मासळीचे प्रमाण कमी होण्यावर झाला आहे. या मासळी दुष्काळी स्थितीमुळे उरणच्या पाणजे, भेंडखळ आणि जासई व इतर ठिकाणी येणारे फ्लेमिंगो व विविध जातींचे पक्षी यांची संख्या रोडावू लागली आहे.
हेही वाचा : कोकण भवन मधील कामकाज ठप्प: जुनी पेन्शन योजना मागणीसाठी कर्मचारी संपावर, अधिकारी सामूहिक रजेवर
काही ठिकाणी पाणथळ शिल्लक असली तरी पाण्यात मासळीच नसल्याने पक्ष्यांची उपासमार वाढली आहे. एकीकडे खाद्य नाही तर दुसरीकडे उष्माघात याने पक्षी जीवनच धोक्यात आले आहे. निसर्गाच्या रक्षणासाठी महत्वाच्या असलेल्या पक्ष्यांचे संरक्षण हे ऐरणीवर आले आहे. त्यामुळे येथील विकासाच्या नावाने सुरू असलेल्या निसर्गाला नष्ट करणाऱ्या कामांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.