उरण : मानव जात एक आहे, तर मग जात, पात, धर्माच्या नावाने माणसा माणसात भेद का ? असा सवाल शुक्रवारी उरणच्या जेएनपीटी कामगार वसाहतीत आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेपाटील यांनी उपस्थित केला. उरण मधील सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या सामाजिक क्षेत्रातील कामगिरीबद्दल आयोजित सत्कारात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी यावेळी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी संपत्तीचा अधिकार दिला. तर महात्मा फुले, सावित्रीबाई यांनी शिक्षण दिले. मात्र आज शिक्षणाचे बाजारीकरण व खाजगीकरण करून पुन्हा समाजाला वंचीत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजाला गरीब आणि अशिक्षित, अज्ञानी ठेवून राज्य करीत आहेत. प्रामाणिकपणा असल्यास न भीता जीवन जगता येते. शिक्षण हे स्वतंत्र विचार करायला शिकवते, म्हणून माणूस म्हणून जन्माला आलो तर समाजासाठी जगले पाहिजे, असे म्हणत निरपेक्ष भावनेने समाजासाठी काम करण्याचे आवाहन कोळसे पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : कोंबिंग ऑपरेशनमध्ये ८४ लाख ८५ हजारांचा अंमली पदार्थ साठा जप्त, नायझेरियन नागरिकाला अटक

भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे जनशक्तीच्या व अहिंसेच्या मार्गाने हक्कासाठी लढूया, असे ही ते म्हणाले. इथला विकास हा भकास करणारा आहे. उरणची जमीन ही काळी आई आहे. ती पुन्हा निर्माण होणार नाही. ती कवडीमोलाने विकू नका असेही आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, सुरेश ठाकूर, भूषण पाटील, सुधाकर पाटील, गोपाळ पाटील, प्रमिला पवार आदीजण उपस्थित होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran former judge b g kolse patil asks question if human race is one then why differentiate between human beings on caste basis css