उरण : समुद्राच्या उधाणाने खोपटे ते आवरे परिसरातील जवळपास दहा किलोमीटर लांबीची खार बंदिस्ती नादुरुस्त होऊन हजारो एकर पिकत्या भातशेतीत खारे पाणी शिरून शेतीचे नुकसान होत आहे. ही शेती वाचविण्यासाठी खारलँड विभागाने ३ कोटी ४१ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे. त्याला मंजुरी मिळावी अशी मागणी उरणच्या शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र येणार आहेत.
खाडीकिनारच्या शेतीचे संरक्षण गरजेचे
उरण हा अरबी समुद्राच्या कुशीत खाडी किनाऱ्यावर वसलेला तालुका आहे. त्यामुळे येथील बहुतांश शेतकरी हे खाडीकिनाऱ्यावरील शेती करीत आहेत. मात्र या परिसरात होणाऱ्या औद्याोगिकीकरणामुळे मिठाचा व्यवसाय संपुष्टात आला आहे. त्यात खारलँड विभागाने उरण तालुक्यातील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या मजबुतीची कामे न केल्याने, भातशेतीचे संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उद्ध्वस्त होत आहे.
हेही वाचा : पनवेल : लाभार्थींना अद्याप मिळाले नाही घर, आठ महिन्यांनंतरही महागृहनिर्माण प्रकल्पाची प्रक्रिया सुरूच
खोपटे ते आवरे बांध परिसरात पिरकोन, आवरे, गोवठणे, बांधपाडा (खोपटा) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांग पाले खार, काशी, पारंगी, रेवचा वळा खार येथील जमिनी आहेत. या खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती समुद्रातील उधाणाच्या पाण्यात उद्ध्वस्त झाली आहे. दरवर्षी पावसाच्या पुराने तर आता समुद्राच्या कहराने शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नापिकीच्या संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यासंदर्भात खारलँड विभागाकडून पाहणी करून माहिती घेतली जाईल असे मत पेण खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी व्यक्त केले आहे.