उरण : चैत्र महिन्यात ग्रामीण भागातील सध्या ग्रामदैवत, देवीदेवतांच्या यात्रा-जत्रा यांची उरण तालुक्यात सुरुवात झाली आहे. यासाठी पारंपरिक शासनकाठ्या, कुटुंबातील व्यक्तींच्या सामूहिक भोजनाच्या मेजवन्या यांची चंगळ असते. यात न्हावा गावची ग्रामदेवता गावदेवीचा यात्रा उत्सव बुधवारी २३ तर पालखी सोहळा २४ एप्रिल रोजी पार पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समुद्रकिनाऱ्यावरील डोंगरातील निसर्गाच्या सान्निध्यात मंदिरात विराजमान असलेल्या न्हावा ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या गावदेवीवर भाविकांची अपार श्रद्धा आहे. या श्रद्धेमुळे दरवर्षी गावदेवीच्या यात्रा-पालखी सोहळ्यासाठी अनेक तालुक्यांतील ५०-६० हजार भाविकांची दर्शनासाठी गर्दी उसळते. आबालवृद्ध भाविकांच्या मनोरंजन, विरंगुळ्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेची दुकाने, आकाशपाळणे यांची मोठी रेलचेल असते. रात्री ९ वाजता देवीची पालखी मिरवणूक काढून गावभर फिरवण्यात येते. गुलाल उधळीत विविध वाद्यांच्या तालावर नाचत पालखी मिरवणुकीत भाविक सहभागी होतात. भाविकांच्या उत्साहामुळे देवीची पालखी माघारी मंदिरात येण्यासाठी कधी कधी २४ तासांहूनही अधिक कालावधी लागतो.

हेही वाचा : वाहतूक बेटासह चौकाचे काँक्रीटीकरण; सीवूड्स येथील तांडेल मैदान चौकात अपघातापासून बचावासाठी महापालिकेचे पाऊल

करंजा येथील द्रोणगिरी देवीची यात्रा पालखी सोहळा ३० एप्रिल ते १ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. द्रोणगिरी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या द्रोणगिरी देवी वसलेली आहे. द्रोणगिरी देवी पंचक्रोशीतील आगरी- कोळ्यांची माउली आहे.

द्रोणगिरी देवीच्या यात्रा पालखी मिरवणुकीत हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होऊन देवीच्या चरणी नतमस्तक होतात. जसखार ग्रामस्थांची प्रसिद्ध ग्रामदेवता श्रीरत्नेश्वरी देवीचा यात्रा पालखी उत्सवही दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या वर्षीही श्रीरत्नेश्वरी देवीचा यात्रा पालखी सोहळा १ ते २ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. श्रीरत्नेश्वरी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी उसळते.

हेही वाचा : रेशनदूकानदाराला जाब विचारणाऱ्या माजी नगराध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल

गव्हाण, नवीन शेवा, फुंडा, कोप्रोली येथे उत्सव

पुढील आठवड्यात गव्हाण गावची शांतादेवी, नवीन शेवा येथील शांतेश्वरी, फुंडा गावची घुरबादेवी आदी ग्रामदेवतांचाही यात्रा पालखी मिरवणूक सोहळा साजरा केला जाणार आहे. कोप्रोली गावची ग्रामदेवता जोगेश्वरी व बापूजी देव यात्रा उत्सव ७ ते ८ मे रोजी पार पडणार आहे. या यात्रेत देवकाठ्या नाचविण्याची प्रथा आहे. देवकाठ्या नाचविण्याचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran gaon dev yatra season started yatras in various villages surrounding uran city css