उरण : शासनाने कितीही लोकोपयोगी आरोग्य सुविधा जाहीर केल्या तरी सर्वसामान्य गरीब रुग्ण हे शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उपचार घेण्यासाठी जातात. मात्र उरण तालुक्यातील एकमेव असलेल्या कोप्रोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येथील रुग्ण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्या आहेत.

उरणच्या पूर्व विभागात असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रामुख्याने या परिसरातील दुर्गम भागात राहणारे आदिवासी, गरीब शेतकरी यांना होणारे विंचू, सर्पदंश अशा जीवघेण्या रुग्णांवर वेळेत उपचार होत नाहीत. त्यामुळे रुग्णालय आणि औषधे उपलब्ध असूनही उपचारांआभावी रुग्णांवर आपला जीव गमावण्याची वेळ येऊ शकते असा आक्षेप सामाजिक कार्यकर्त्यांनी नोंदवला आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : मोरबे धरणात ४९ टक्के जलसाठा

न परवडणारे वैद्यकीय उपचार यामुळे अनेक गरीब, गरजू ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी असलेल्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्रभर वैद्यकीय अधिकारी थांबत नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.

९ मार्च रोजी चिरनेर खैरकाठी येथे राहणाऱ्या १२ वर्षीय निशा संतोष भगत या मुलीला रात्री ९ च्या सुमारास विंचू दंश झाला. परिसरातील प्राणी मित्राच्या मदतीने या मुलीला उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणले होते. मात्र सात वाजल्यानंतर डॉक्टर आरोग्य केंद्रात थांबत नसल्याने उरण येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन त्यांना माघारी पाठविण्यात आले.

हेही वाचा…नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 

नातेवाईकांनी प्राणी मित्रांच्या मदतीने वेळ न दवडता निशा हिला इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर तिला घरी पाठवल्याची माहिती इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक बाळासो काळेल यांनी दिली.

ग्रामीण भागात असलेले कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण विभागातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे उरण परिसरातील विशेषता ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आश्रयाला जातात. मात्र सायंकाळी सात वाजल्यानंतर या केंद्रात एकही डॉक्टर थांबत नसल्याने ग्रामीण भागातून रात्रीच्या वेळी येणाऱ्या साप, विंचू दंश तसेच अन्य रुग्णांची डॉक्टरांअभावी मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे.

हेही वाचा…नवी मुंबई : ५२ लाख १३ हजारांची फसवणूक…… कमी वेळात जास्त परताव्याचे आमिष पडले महागात 

उरण तालुक्यातील कोप्रोल्री हे एकमेव आरोग्य केंद्र आहे. दुर्गम भागात राहणारे आदिवासी रुग्ण येथे येतात. परंतु, रात्रीच्या वेळी वैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.

ग्रामीण रुग्णालयावर कामाचा ताण

उरण परिसरातील रुग्णांच्या उपचारासाठी शहरातील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आणि कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र अशी सध्या दोन उपचार केंद्रे आहेत. ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयावर संबंध तालुक्याचा भार आहे. दररोज २५० बाह्यरुग्णांची वर्दळ असलेल्या ग्रामीण रुग्णालयावर इतर अनेक कामांचा वाढता ताण आहे.

हेही वाचा…अनाथ मुले व तृतियपंथींसोबत पोलीसांची अनोखी रंगपंचमी

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या फक्त दोनच महिला डॉक्टर कार्यरत आहेत. दोन्ही महिला डॉक्टर सायंकाळी सातनंतर थांबत नसल्याने रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – डॉ. राजेंद्र ईटकरे, तालुका आरोग्य अधिकारी

Story img Loader