उरण : मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाचा होळी हा अतिशय मोठा सण असल्याने या निमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून हजारो मासेमारी बोटी नांगर टाकून किनाऱ्यावर विसावल्या आहेत. परिणामी मासळीची आवक घटली आहे. त्यामुळे ताज्या मासळीच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. याचा फटका खवय्यांना बसू लागला आहे. यात पापलेट, सुरमई, हलवा आणि कोळंबी यासह अनेक चविष्ट माशांचे प्रकार कमी प्रमाणात मिळत असल्याने किलोमागे या माशांचे दर अधिक वाढले आहेत.

मासेमारी करणारे खलाशी सुट्टीवर असल्याने आणि होळीचा हंगाम सुरू असल्यामुळे मासळीच्या दराने ही उसळी घेतली आहे. शिवाय बदलत्या वातावरणामुळेही मासळीची आवक घटल्याने मासळीच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सागरी किनाऱ्यावरील हजारो बोटी बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. पावसाळ्यातील दोन महिन्यांचा कालावधी वगळता वर्षातील दहा महिने खलाशी व तांडेल खोल समुद्रात मासेमारीच्या निमित्ताने कुटुंबापासून दूर असतात. परंतु हे मच्छीमार कुटुंबाबरोबर होळीचा सण साजरा करण्यासाठी माघारी परततात. काही दिवस तरी मासेमारी बंद राहणार असल्याने होळी सणाच्या आधीपासूनच मासळीची आवक घटली आहे. परिणामी भाव चांगलेच कडाडले आहेत.

मासळीचे दर वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत, पण यामागे अनेक कारणे आहेत. डिझेल, बर्फ, जाळी, आणि देखभाल यांचे खर्च प्रचंड वाढले आहेत. शिवाय, हवामान बदलामुळेही मासळी कमी मिळते. या सगळ्याचा परिणाम मासळीच्या दरांवर होत आहे.

मार्तंड नाखवा, राज्य अध्यक्ष, फिशरमन काँग्रेस</strong>

मासळीचे नाव — आधीचे दर — आताचे दर

पापलेट — ९०० ते १००० — १३०० ते १४००

सुरमई — ५५० ते ६५० — ८५० ते १०००

कोळंबी — ४०० ते ४५० — ४५० ते ५००

रिबनफिश — १२५ ते १५० — १७५ ते २००

हलवा–४०० ते ४५०–५०० ते ५५०

माकुळ–३६० ते ४००–५५० ते ६०

रावस — ५५० ते ६००–६५० ते ७००

रायगडच्या खोल समुद्रातील चविष्ट म्हावरं, सुरमई, पापलेट म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण! पण सध्या म्हावरं कडाडल्याने खवय्यांना आपल्या खाण्याला मुरड घालावी लागत आहे.