उरण : सहा महिन्यांपासून ठेकेदार नसल्याने काम बंद झाले असून करंजा ते रेवस जलमार्गावरील रेवस रो रो जेट्टीच्या कामासाठी नवीन ठेकेदार नेमण्यात येणार आहे. मात्र ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीची या आचारसंहिता संपल्यानंतर सुरू केली जाईल. त्यानंतर जेट्टीच्या कामाला पुन्हा सुरुवात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. उरण आणि अलिबाग या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रो रो जलमार्गाचे काम जून २०२४ ला पूर्ण करण्यात येणार होते. मात्र ठेकेदाराकडून कामच बंद केल्यामुळे येथील नागरिकांना आणि प्रवाशांना आणखी काही महिने प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे संकेत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने दिले आहेत.
करंजा रो रो जेट्टीचे काम पूर्ण होऊन आठ वर्षे झाली आहेत. कामात होत असलेल्या दिरंगाईबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उरण व अलिबाग या रायगड जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील खाडीवर गोव्यातील वाहन वाहतुकीची रो रो पद्धतीची सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याच्या कामाला सात वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली आहे. या सेवेतील करंजा बंदरातील रो रो जेट्टीचे काम २०१७ साली पूर्ण झाले आहे. मात्र त्याचवेळी अलिबाग येथील रेवस बंदराचे कामही सुरू करण्यात आले होते. आठ वर्षे लोटल्यानंतरही रेवस जेट्टीचे काम अपूर्णच आहे. त्यामुळे या सेवेचे काम पूर्ण होणार का असा सवाल प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. सध्या या मार्गावरून दोन्ही तालुक्यांतील शेकडो प्रवासी प्रवास करीत आहेत. यातील दुचाकी वाहनाने प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने आहेत. या मार्गावरून सध्या सुरू असलेल्या प्रवासी बोटीतून धोकादायक रीतीने वाहनांचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गवरील महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून सुरू करण्यात येणारी रो रो सेवेचे काम धीम्या गतीने सुरू आहे. रेवस जेट्टीच्या कामात अनेकदा अडथळा निर्माण झाला आहे.
हेही वाचा : उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ
आचारसंहितेनंतर नवीन निविदा
रेवस जेट्टीचे काम करणारा ठेकेदार काम करण्यास असमर्थ आहे. त्यामुळे या कामाची नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. ही निविदा लोकसभा निवडणुकीनंतर करून नव्याने काम सुरू करण्यात येईल त्याचप्रमाणे कामाचा वाढीव खर्च हा जुन्या ठेकेदाराकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी दिली आहे.
हेही वाचा : नवी मुंबई: पदपथावर बांधकाम व्यावसायिकाचे अनधिकृत कार्यालय
करंजा टर्मिनलची दुरवस्था
करंजा रेवस या रो रो जलमार्गासाठी करंजा येथे बांधण्यात आलेल्या करंजा प्रवासी टर्मिनलच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या इमारतीच्या सुरक्षा भिंतींना तडे गेले आहेत. तर अनेक ठिकाणच्या खिडकीच्या काचाही फुटल्या आहेत.