उरण : वाढते उद्योग आणि मुंबई-गोवा तसेच कोकणात ये-जा करण्यासाठी महत्त्वाच्या उरणच्या खोपटे- कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. यामध्ये एकाच ठिकाणी खड्डे पडलेले असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था जैसे थे आहे. त्यामुळे या मार्गावरील अपघात आणि वाहतूक कोंडीत भर पडली आहे. या खड्ड्यामुळे सायंकाळी अनेक तासांच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेएनपीटी बंदरामुळे खोपटे परिसरात बंदरावर आधारित गोदाम उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावरून दररोज हजारो अवजड कंटेनर वाहने ये-जा करीत आहेत. येथील मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाच्या प्रवेशद्वाराजवळ खोपटा-कोप्रोली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या वाढत्या खड्ड्यांमुळे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभाग उरण यांनी अपघाताची वाट न पाहता सदर रस्त्याची पाहणी करून खड्डेमुक्त रस्ता करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा : मत्स्यसंपदा घटल्याने लाखो मच्छीमारांवर आर्थिक संकट

उरण, जेएनपीए बंदर परिसराला जोडणारा उरण पूर्व विभागातील खोपटा-कोप्रोली हा सा. बां. विभाग उरणचा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सा.बां. विभागाने या अगोदर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला असून या परिसरातील गोदाम व्यवस्थापकांनी निधी खर्च केला असल्याची माहिती मिळत आहे. या मार्गासाठी ३ कोटी ७५ लाखांचा निधी ठेकेदारांच्या माध्यमातून खर्च करण्यात आला होता. मात्र संबधित विभागाच्या दुर्लक्षामुळे कोट्यवधीचा निधी खर्च करूनही सदर रस्त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran potholes on khopte to koproli road after expenditure of crores of rupees css
Show comments