उरण : सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे उरणला पाणीपुरवठा करणारे रानसई धरण भरून वाहू लागले आहे. दुपारी ११.४५ वाजता हे धरण काठोकाठ भरले. त्यामुळे उरणकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून जलचिंता दूर झाली आहे.
रानसई धरणातून उरणमधील औद्याोगिक कारखान्यांसह, येथील २५ पेक्षा अधिक ग्रामपंचायती व उरण नगर परिषदेला पाणीपुरवठा होतो. मात्र पाणीसाठा अपुरा पडू लागल्यामुळे एमआयडीसीला सिडकोच्या हेटवणे धरणातून येणारे उसने पाणी घ्यावे लागत आहे. तर नोव्हेंबर महिन्यातच आठवड्यातून दोन दिवस पाणीकपातीची वेळ आली होती. शिवाय धरणाची साठवणूक क्षमता ही १० दशलक्ष घनमीटरवरून ७ दशलक्ष घनमीटरवर आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे. धरण क्षेत्रात आतापर्यंत ८८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी दुपारी ११.४५ वाजता रानसईने ११६ फुटांची पातळी गाठल्याने धरण भरून वाहू लागले असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे अभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली.
हेही वाचा : विजेच्या तारा तुटल्याने चार गावे १० तास विजेविना
पाणीपातळी वाढीचा वेग अधिक
मागील वर्षी रानसई १८ जुलैला भरले होते. या वर्षी पाऊस उशिराने व धिम्या गतीने होऊनही २०२३ च्या तुलनेत तीन दिवस आधीच धरण भरून ओसंडून वाहू लागले असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे पाणी कपातीचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.