उरण : विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून उरण विधानसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना(ठाकरे गट)व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात चुरस वाढली आहे. या दोन्ही घटक पक्षांच्या इच्छुकांनी मतदारसंघात आपला स्वतंत्र प्रचार ही सुरू केला आहे. यात ठाकरे गटाचे माजी आ. मनोहर भोईर व शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी आघाडी घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे. उरण विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मताधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढाई झाल्यास ही विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडीचे मुख्य घटक असलेल्या शिवसेना(ठाकरे गट), शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दावा केला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप समर्थित अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. तर शिवसेना (अखंड) दुसऱ्या क्रमांकावर होती.

हे ही वाचा…पामबीचवर मुलाच्या मृतदेहाजवळ पालकांचा आक्रोश, वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब

त्याचप्रमाणे या मतदार संघात पहिला आमदार देणारा शेतकरी कामगार पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. मात्र यांच्या मतामधील अंतर कमी होते. त्यामुळे अस्तित्वाच्या या निवडणुकीत या पक्षाकडून दावे केले जात आहेत.

आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच ही निवडणूक लढविणार असून उमेदवारी संदर्भात जो निर्णय वरिष्ठ घेतील तो आपल्याला मान्य असेल असे मत माजी आ. मनोहर भोईर यांनी व्यक्त केले आहे. तर आपल्यावर शिंदे गटाशी संपर्क असल्याचा खोटा आरोप केला जात असून अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे.

हे ही वाचा…ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधानांच्या उपस्थितीत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सूखोई विमानाची चाचणी

मी महाविकास आघाडीकडून इच्छुक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील त्यानंतर शेतकरी पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील जो आदेश देतील त्यानुसार पुढील दिशा ठरविण्यात येईल असे मत प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा…चिरनेर जंगल सत्याग्रहातील स्मारकांची दुरवस्था बांधकाम विभाग, पंचायत समितीचे दुर्लक्ष

भाजपला फायदा

महाविकास आघाडीतील वाढत्या दावेदारीमुळे भाजपाला या निवडणुकीत लाभ होण्याची शक्यता आहे. २०१९ च्या निवडणुकीत आमदार महेश बालदी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. मात्र २०२४ च्या निवडणुकीत बालदी हे भाजपाचे उमेदवार असणार आहेत. महाविकास आघाडीत बिघाडी व्हावी यासाठी त्यांच्याकडूनही प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये महाविकास आघाडीत फूट पडून दोन उमेदवार उभे राहिल्यास ही निवडणूक भाजपसाठी फायद्याची ठरणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In uran tensions rise between shiv sena thackeray and shetkari kamgar party ahead of assembly elections sud 02