उरण : बुधवारी सायंकाळी उरण तालुक्यात विजेच्या गडगडाटासह झालेल्या अवेळी पावसाने भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. उरणमध्ये मागील तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र बुधवारी अवेळी बरसलेल्या पावसामुळे कापणी, मळणीला आलेल्या भात पिकाला चांगलाच फटका बसला आहे.
हेही वाचा : नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १७ वर्षीय मुलगी निघाली मास्टरमाइंड, चौघींची सुटका
या पावसाचा परिणाम पावसाळ्यानंतर पेरण्या करण्यात आलेल्या इतर पिकांवरही झाला आहे. अवेळी पावसानंतर तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे हिवाळी भाजीपाला फळांवर देखील या ढगाळ वातावरणाचा परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रायगड जिल्ह्याबरोबरच उरण तालुक्यात चिरनेरसह अनेक गावातील बागायतदारांना बदलत्या हवामानाचा व अवेळी पावसाचा चांगलाच फटका बसल्यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. या नैसर्गिक बदलामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कृषी विभागाने या नुकसानीचे पंचनामे करून नोंद करावी व नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.