उरण : विकसनशील व राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या नजीकच्या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकाही उमेदवाराने संकल्प पत्रात उरण मतदारसंघातील खेळांची मैदाने तसेच क्रीडाविषयक अन्य सुविधांचा उल्लेखही केलेला नाही. या महत्त्वाच्या व आवश्यक सुविधेकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. एक विकसनशील मतदारसंघ म्हणून परिचित असलेल्या या मतदारसंघात खेळाच्या मैदानाचा अभाव आहे. या संदर्भात खेळाडू आणि खेळप्रेमींकडून खेद व्यक्त केला जात आहे.

सध्या खेळाच्या माध्यमातूनच अनेकांचे भविष्य घडले आहे. आपल्या पाल्याने खेळात करिअर करावे यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी अनेक कष्ट घेतले जात आहेत. उरण मतदारसंघातही हीच स्थिती आहे. येथील विविध क्रीडा प्रकारांतील खेळाडूंना मुंबई किंवा नवी मुंबईत जावे लागत आहे. अनेकांना लांबवरचा प्रवास करून खेळाचा सराव करावा लागत आहे. त्यासाठी वेळ, पैसा खर्च होत आहे.

हेही वाचा : उरण-करंजा मार्गाची दुरवस्था कायम

मतदारसंघातील उरण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांतील अनेक प्रकारच्या खेळात राष्ट्रीय व राज्य पातळीवर खेळाडूंनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. अनेकांनी तर परदेशात जाऊन या मतदारसंघाचे नाव मोठे केले आहे. मात्र या मतदारसंघात सर्वसामान्य खेळाडूंना सराव करता येईल किंवा खेळ खेळता येईल असे एकही मैदान नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंना मिळेल क्रीडा प्रकारांचा सराव हा सरावास अयोग्य असलेल्या परिसरात आपला सराव करावा लागत आहे. यात महिला खेळाडूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा : नवी मुंबई: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर, बंडाच्या हंगामात पक्ष जोडणीचे आव्हान

उरणच्या तालुका क्रीडांगणाची रखडपट्टी

गेल्या वीस वर्षांपासून उरण तालुक्यातील खेळाडूंसाठी शासनाने क्रीडा संकुल मंजूर केले आहे. मात्र या संकुलासाठी भूखंडाचा शोध सुरू आहे. याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने हे क्रीडा संकुल रखडले आहे. क्रीडा संकुलासाठी दहा वर्षांपूर्वी शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र त्याचा वापर न झाल्याने हा निधी परत जाण्याची शक्यता आहे.