जगदीश तांडेल, लोकसत्ता
उरण : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या मात्र अनेक वर्षे टंचाईग्रस्त म्हणून गणल्या जाणाऱ्या चाणजेमधील जलजीवन मिशनची पाणीपुरवठा योजना वर्षभरापासून रखडली आहे. राजकीय हेवेदावे आणि ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यामुळे ही योजना पूर्ण होणार का, असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे.
चाणजे उरणमधील ३० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. यातील करंजा परिसरातील कोंढरीपाडामध्ये येथील नागरिक वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. पंधरा ते वीस दिवसांनी येणारे पाणी आणि त्यातही दूषित पाणी यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा-वाशीत कापडी पिशव्या देणारे यंत्र कार्यान्वित
या समस्येवर उपाय म्हणून जलजीवन मिशनच्या माध्यमातून चाणजे ग्रामपंचायतीसाठी १० कोटी रुपयांच्या निधीतून योजना मंजूर झाली आहे. ही योजना दोन वर्षांत पूर्ण करण्यात येणार होती. या मुदतीतील एक वर्ष सरले आहे. तरीही काम अपूर्णच आहे. ही योजना पूर्ण झाल्यास अनेक वर्षे पाणीटंचाईग्रस्त करंजा परिसराला पाणी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. चाणजे ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन योजनेतून १० कोटींचा निधी मंजूर आहे. यातील मुख्य वहिनी आणि गावातील वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत.
योजनेला पाणीपुरवठा कोण करणार?
चाणजे ग्रामपंचायतीच्या नव्या पाणीपुरवठा योजनेला पाणी कोण देणार, असा प्रश्न आहे, कारण एमआयडीसीची ९ कोटींपेक्षा अधिकची थकबाकी आहे, तर सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा विभागाचीही थकबाकी आहे. त्यामुळे दहा कोटी रुपये खर्च करून टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीला पाणीपुरवठा कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
आणखी वाचा-दोन शालेय विद्यार्थ्यांची आत्महत्या.. तर शिक्षिकेची विद्यार्थीनीला जबर मारहाण; गुन्हा दाखल
चाणजे ग्रामपंचायतीसाठी मंजूर जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. त्याचा एक वर्षाचा कालावधी असून या काळात ही योजना पूर्ण केली जाईल; परंतु योजनेसाठी लागणारे भूखंड ग्रामपंचायतने उपलब्ध केले नसल्याची तसेच सिडकोकडून पाणी घेणार आहे. -नामदेव जगताप, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण