राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल बस आगारात दिवसाला ५० हजार प्रवाशांचा राबता असतो. राज्यातील सर्वाधिक रहदारीच्या आगार परिसरात सध्या धुळीचे साम्राज्य पसरले आहे. ही उणीव म्हणून की काय, खड्डय़ांचीही भर पडली आहे. त्यामुळे बसमध्ये असंख्य धक्के सहन करीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो.
आगारात काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र वाळू आणि सिमेंटचा पसारा आहे. काँक्रिटीकरणाच्या कामाला अजून दोन महिने लागतील. त्यामुळे या त्रासाला पर्याय नाही, असे आगार नियंत्रकांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना आगारात काही मिनिटे काढावी लागतात. त्यामुळे त्यांच्या नाकातोंडात धूळ जाते. आगारातील उद्घोषणा करणारे ध्वनिक्षेपक काही वेळा बंद अवस्थेत असल्याने बस आगमनाची वा फलाटाची सूचना प्रवाशांना कळत नाही.
आगाराचे शौचालय कित्येक वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. या शौचालयात वर्षांनुवर्षे पाणी नाही. अनेकांचा तर या शौचालयामध्ये श्वास गुदमरतो. पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पत्ता नाही, तिथे स्वच्छतागृहात कोठून पाणी येणार, असा सवाल प्रवासी करीत आहेत. त्यामुळे आगारात शिरणे अनेकांच्या जिवावर आलेले असते.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन दिवसांपूर्वी निर्माण झाला होता. जलवाहिनी दुरु स्तीनंतर आता पाण्याची व्यवस्था सुरळीत आहे. शौचालयाच्या स्वच्छतेचे काम सुरू आहे. आगारात खड्डे आहेत हे खरे आहे, मात्र काँक्रिटीकरणाचे काम सुरू असेपर्यंत ही समस्या काही प्रमाणात सुरू राहील, तसेच आगारातील उद्घोषणा यंत्रणा सुरू आहे.
– अरुण शिरसाठ, वाहतूक नियंत्रक (प्रभारी)