पालिका रुग्णालयांतील असुविधा कायम

पालिकेने कोटय़वधी रुपये खर्चून ऐरोली आणि नेरुळ येथे उभारलेल्या बहुमजली रुग्णालयांना असुविधांची लागण झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फरफट होत आहे. या रुग्णालयांमध्ये कमी खर्चातील उपचार सामान्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासनाने डोळेझाक केल्याचे स्पष्ट झाले आहे.

रुग्णालयाची इमारत बांधून झाल्यानंतरही रुग्णसेवा सुरू होण्यास बराचसा कालावधी लागला होता. त्यात रुग्णालयातील काही विभागांत ऑक्सिजनवाहिन्या टाकण्यात न आल्याने पूर्ण सेवा सुरू होण्यास आणखी उशीर झाला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोयीतही भर पडली आहे. निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनाला हाताशी धरून बाह्य़रुग्ण सुरू केला. त्यानंतर गेल्या ऑगस्टमध्ये इतर सुविधा पुरविण्यात आल्याचा  गाजावाजा करण्यात आला.

ऐरोली, नेरुळ रुग्णालयात गर्भवती महिलांसाठी बारुग्णसेवा उपलब्ध आहे. रुग्णालयात स्त्री-रोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे येथील गर्भवती महिलांना वेदना चालू झाल्यास रुग्णवाहिनीने वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालय नेऊन सोडण्यात येते. प्रसूती झाल्यानंतर पुन्हा संबंधित रुग्णालयात आणून सोडले जाते. बुधवारी सकाळी नेरुळ येथील रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेला भोवळ आल्याने संबंधित रुग्णालयात पुढील उपचाराची सोय नसल्याने वाशीत आणण्यात आले होते, असे रुग्णवाहिनीच्या वाहकाने सांगितले.

कोपरखैरणे, तुर्भे आणि बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयांच्या इमारतींच्या बांधकामांतील रखडपट्टीमुळे तेथील रुग्णालये बंद आहेत. याचा सर्व भार वाशी येथील संदर्भ रुग्णालयावर सध्या पडत आहे. या रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला आहे. खाटांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे करत गर्भवती महिलांना कळवा, मुंबई रुग्णालयांचा रस्ता दाखवला जातो. काही महिलांची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याचे एका नागरिकाने सांगितले.

ऐरोली रुग्णालयातील असुविधांचा फटका रुग्णांना बसत आहेत. येथे डेंग्यू, चिकुनगुन्या साथींची तपासणी करण्यासाठी रुग्णांना रुग्णवाहिकेने वाशी येथे सोडले जाते.

याशिवाय केसपेपर काढण्यासाठी एकच काऊंटर असल्याने रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागते. रुग्णालयात दोन रुग्णवाहिन्या आहेत. त्यात गर्भवतींना सोडण्यासाठी  कधी कधी रुग्णवाहिका नसल्याने महिलांची मोठी अडचण होत आहे.

केवळ मलमपट्टी

वाशी-ऐरोली येथील रुग्णालयांत दंतचिकित्सा सेवेच्या अत्याधुनिक यंत्रणा नाही म्हणून फक्त बारुग्ण सेवा पुरवली जाते. पुढील उपचारासाठी नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालयात धाडले जाते असे प्रकाश गमरे या नागरिकाने सांगितले. २००४मध्ये प्रशासनाने डायलिसिस, सीटी स्कॅन व एमआरआय सेवेची मागणी केली होती. २००७ साली संबंधित यंत्रणांसाठीचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला. डायलिसिसची सोय झाली; परंतु सीटी-स्कॅन एमआरआय यंत्रणा अजून कार्यान्वित नाही. यासाठी फोर्टिज किंवा अन्य खासगी रुग्णालयांचा संदर्भ रुग्णांना दिला जात आहे. गटार, वॉटर, मीटर विषय मंजूर होतात; परंतु रुग्णांना सुविधा देण्यासाठी गेल्या १२ वर्षांपासून ही यंत्रणा प्रतीक्षेत आहे. ट्रॉमा केअर सेंटर वाशी संदर्भ रुग्णालयात सुरू केले असले तरी तेथे केवळ छोटय़ा शस्त्रक्रिया होतात. तज्ज्ञांअभावी मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी हिरानंदानीसारख्या बडय़ा रुग्णालयांचा संदर्भ दिला जात आहे, असे भरत भालेराव या नागरिकाने सांगितले.

स्त्री-रोगतज्ज्ञ नेमण्यासाठी मुलाखती सुरू आहेत. ऐरोलीत चार प्रसूतीतज्ज्ञ होत्या. याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला; परंतु त्यावर एका वर्षांत कारवाई होणे अपेक्षित होते. त्यानंतर नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला. पिंपरी-चिंचवड महापालिका यांसारख्या धर्तीवर ऐरोली, नेरुळ यांसारख्या रुग्णालयात आऊटसोर्सिगवर ही यंत्रणा सुरू करण्याचा विचार आहे.

रमेश निकम, मुख्य वैद्यकीय अधिकारी