मुंबई कृषी उत्पन्न कांदा बटाटा बाजारात नवीन लसूण दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे जुन्या लसणाची मागणी अधिक वाढल्याने दर वधारले आहेत. नवीन लसूण बाजारात प्रतिकिलो २० ते ६० रुपयांनी विक्री होत असून जुन्या लसणाची मागणी वाढत आहेत. त्यामुळे दरात १०रुपयांची दरवाढ झाली आहे. आधी ८०-१०० रुपयांनी उपलब्ध असलेला लसूण आता ८०-११० रुपयांनी विक्री होत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : प्लास्टिक विरोधी जनजागृतीत आता तृतीयपंथीयांचीही मदत; अनोखा उपक्रम

जानेवारी- फेब्रुवारीमध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते. सुरुवातीला लसणाचे दर आवाक्यात होते. परंतु मागील दोन आठवड्यापासून लसणाच्या दरात वाढ होत आहे. जानेवारी सुरुवातीपासून बाजारात नवीन लसूण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी बाजारात अवघ्या ३ गाड्या आवक झाली आहे. तेच मागील आठवड्यात १०-१५गाड्या दाखल झाल्या होत्या. बाजारात अवघ्या ३ गाड्या दाखल असून यापैकी एक गाडी नवीन लसूण तर उर्वरित जुना लसूण आहे. पंरतु ग्राहक ओल्या नवीन लसणापेक्षा सुका टिकाऊ जुन्या लसणाला अधिक पसंती देतात. त्यामुळे बाजारात जुन्या लसणाची मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात नवीन लसूण २०-६०रुपये तर जुना लसूण ८०-११० रुपयांनी विक्री होत आहे. सुरुवातीला दर आवाक्यात होते त्यामुळे गृहिणींनी समाधान व्यक्त केले होते. मात्र पुन्हा दर वाढल्याने गृहिणींच्या खिशाला कात्री बसत आहे .