नवी मुंबई नियोजित शहर असले तरी प्रशासनातील काही अधिकारी आणि झोपडपट्टी राजकीय नेत्यांच्या अभद्र युतीने एपीएमसी परिसरात अजून दोन झोपडपट्टी आकारास येत आहेत. मात्र, याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत असून वेश्या वृत्ती, गुंडगिरी, जुगार, दारू पिऊन धिंगाणा, मोठ मोठ्या आवाजात गाणी, असल्या प्रकारात वाढ होत आहे. आता याच्या विरोधात याच परिसरातील रहिवासी संकुलातील सदनिका धारक एकवटले असून मुख्यमंत्री पोलीस आणि महानगर पालिकेकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.
नवी मुंबई हे नियोजित शहर आहे तर लगत आद्योगिक वसाहतीत झोपडपट्टी वसल्या आहेत. मात्र आता झोपडपट्टी दादांचा मोर्चा गेल्या पाच सहा वर्षात एपीएमसीतील सिडको आणि राज्य परिवहनच्या भूखंडावर झोपड्या वसवणे सुरु आहे. या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन अनेकांशी चौकशी केली असता खाजा नावाच्या व्यक्तीला भेटा ते सेटिंग करून देतात ते एका राजकीय पक्षाचे पण काम करत असल्याने परफेक्ट सेटिंग आहे असे सांगण्यात आले. या ठिकाणी वसलेल्या झोपडपट्टीत गोवंडी मानखुर्द लाल डोंगर परिसरातील लोक मोठ्या प्रमणात असून लवकरच येथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू होणार आहे असेही तेथील व्यक्तींनी सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे सिडको आणि राज्य परिवहन मंडळाच्या जागेवर बेकायदा वसलेल्या या झोपड्यात आता पाणी आणि विद्युत पुरवठाही सुरु करण्यात आला आहे. शिवाय काही जणांनी गाडी धुण्याचे (सर्विसिंग सेक्टर) व्यवसाय याच विजेच्या जोरावर दणक्यात सुरु केल्या आहेत. मात्र या दोन्ही प्राधिकरणाचे या कडे दुर्लक्ष केले जाते.या झोपडपट्ट्या मुळे या ठिकाणी रात्री अंधार पडताच किन्नर आणि वेश्यांचा वावर वाढला आहे. पदपथावरून चालणेही अशक्य होत आहे.
हेही वाचा- नवी मुंबई महानगरपालिकेचा ३१ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा
याबाबत कुककुम, पुनीत कॉर्नर,श्रीजी , इसकोम या गृहनिर्माण प्रकल्पात राहणाऱ्या रहिवाशांनी आक्षेप घेत असे अर्ज मुख्यमंत्री , महानगर पालिका आणि पोलीस प्रशासनाला दिले आहे. शनिवार या सोसायटी मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पूर्ण परिसर पिंजून काढला व वेश्यांना जाब विचारताच त्या निघून गेल्या यावेळी सुमारे ५० पेक्षा अधिक नागरिक होते. बाळासाहेब माने, रत्ना भोर, प्राची दरेकर, सारिका शेट्टी, आणता मिटकर, राजेंद्र झुंजारराव, कैलास सगरे, शोभना सगरे, साक्षी राजापूरकर आदींचा समावेश होता.
सुमारे दहा वर्षापूर्वी येथेच रात्रीतून शेकडो जणांनी शंभर शंभर मीटर सीमा आखून जागेवर दावा केला होता. हे भूखंड केंद्र सरकारने गरीब झोपडपट्टी धारकाला मोफत दिले आहेत असे सांगून भूमाफियांनी या लोकांच्या कडून लाखो रुपये लाटले होते. मात्र रातोरात तंबू टाकून बसलेल्या या लोकांची चर्चा शहरभर झाल्याने सिडकोने त्यांच्यावर कारवाई करीत हुसकावून लावले. मात्र तेव्हाही आणि आताही भूमाफियांना वचक बसावा असे एकही पाउल उचलण्यात आले नाही, अशी माहिती भाजपचे नवी मुंबई उपजिल्हाध्याक्ष संकेत डोके यांनी दिली. याबाबत लवकरच प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपाच्या तुर्भे विभाग कार्यालयाने दिली.