नवी मुंबई: सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडल्याने हापूसचे उत्पादन चांगले असेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु अवकाळी पाऊस आणि हवामानबदलाने उत्पादन कमी झाले आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये आवक जादा होती, मात्र आता मुख्य हंगाम असूनही आवक कमी आहे. त्यामुळे मागील आठवड्याच्या तुलनेत हापूसची प्रतिपेटी २००-५०० रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे आता ४-६ डझनांच्या पेटीला २२०० ते ५००० रुपये दर आहे.
एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारी महिना सुरू होताच अवीट गोडीसाठी प्रसिद्ध असलेला हापूस दाखल होण्यास सुरुवात होत असते. या वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस दाखल झाल्यामुळे पुढील कालावधीतदेखील हापूसला सुगीचे दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र या वर्षी अवकाळी पावसाने हापूसच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. मोठ्या प्रमाणात हापूस दाखल होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र हवामानबदलाच्या परिणामी उत्पादनात घट झाली. त्यामुळे यंदा आवक घटली आहे. एप्रिलमध्ये हापूसच्या मुख्य हंगामाला सुरुवात होत असते. एप्रिल-मेदरम्यान बाजारात मोठ्या प्रमाणावर हापूस दाखल होतो. परंतु यंदा फेब्रुवारी-मार्चमध्ये आवक जास्त होती तर आता आवक कमी होत आहे. सोमवारी बाजारात कोकणातील हापूसच्या १८ हजार ५२६ पेट्या दाखल झाल्या, तर इतर राज्यांतील २१ हजार ९४२ पेट्या दाखल झाल्या आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत हापूसची आवक कमी झाली असून, त्यामुळे दर वधारले आहेत. आधी २-४ डझनांच्या पेटीला २ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर होता, परंतु सोमवारी २ हजार २०० ते ५ हजार रुपयांनी विक्री होत आहे.