उरण : थंडीच्या मोसमामुळे सुक्या मासळीची आवक घटल्याने व मागणीत वाढ झाल्याने दरवाढ झाली आहे. यामध्ये सर्वसामान्यांचं अन्न असलेले बोंबील आणि करंदीचे दर गगनाला भिडले आहेत. हे दर किलोला ६०० रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र तरीही किनारपट्टीवरील रहिवासी खिशाला चाट देत सुकी मासळी खरेदी करीत आहेत.
सागरी किनारपट्टीवर खोल समुद्रातील, खाडीतील ताजी आणि यातीलच निवडक सुकविलेली मासळी मिळते. यातील सुकी मासळी ही पावसाळ्यात मासळीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात सुकविलेल्या मासळीचा वापर केला जातो. परंतु समुद्रातील मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शिल्लक आणि लहान आकाराची मासळी सुकविली जाते. त्याचेही प्रमाण कमी झाले आहे. त्याचप्रमाणे ही मासळी सुकविण्यासाठी लागणारी जागा ही उपलब्ध नसल्याने मच्छीमारांना मासळी सुकविणे कठीण झाले आहे. परिणामी सुक्या मासळीचे प्रमाण कमी झाले आहे. या वाढत्या अडचणीमुळे सुक्या मासळीचाही दुष्काळ निर्माण झाला आहे.
हेही वाचा – पनवेलमध्ये पथविक्रेत्यांना साडेदहा कोटींचे कर्जवाटप, पंतप्रधान स्वनिधी योजनेतून लाभ
साधारणपणे सुक्या मासळीत वेगवेगळ्या प्रकारच्या वाकट्या, बोंबील, कोलंबी (सोडे), सुकट, आंबार (करंदी), टेंगळी, मांदेली, ढोमी, शिंगाला, बांगडा आणि सरगे (पापलेट) आदी प्रकारची सुकी मासळीचे प्रकार विक्रीसाठी असतात.
मागणी आणि आवकचे व्यस्त प्रमाण मागील काही वर्षांत मासळीच्या प्रमाणात घट सुरू आहे. त्यामुळे सुक्या मासळीच्या प्रमाणावरही याचा परिणाम झाला आहे. त्यातच किनाऱ्यावर सुरू असलेल्या विविध विकासकामे व उद्याोगांमुळे खाडीतील मासळीही कमी झाली आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : पामबीच मार्गावरील पथदिवे बंद, वेगवान वाहनांमुळे अपघाताचा धोका
मासळीचे दर किलो रुपये
बोंबील ३५० – ६००
करंदी (कोलंबी) ३०० – ६००
सोडे (कोलंबी) १००० – १२००
वाकटी ३५० – ४५०
टेंगळी १२५ – १२५
मांदेली ५० – ८०
कोळीम १५० – २५०
बांगडा १५० – २५०