लोकसत्ता टीम
नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे.अवकाळी पावसाने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात ५५५ गाड्या दाखल झाल्या आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर स्थिर असून हिरवी मिरची, शिमला मिरची, काकडी, गवार, भेंडी, वाटाणा दर वाढले आहेत.
दरवर्षी हिवाळ्यात डिसेंबरमध्ये मोठया प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होत असतो, त्यामुळे दरात घसरण होते. परंतु आता हिरव्या वाटाण्याचा हंगाम संपुष्टात आला असून कमी प्रमाणात वाटाणा बाजारात दाखल होत आहे. गुरुवारी घाऊक बाजारात ११९८क्विंटल आवक झाली आहे. एपीएमसीत हिरवा वाटाणा आधी प्रतिकिलो २८-४०रुपयांनी उपलब्ध होता तो आता ४०-६५रुपयांनी विक्री होत आहे. एपीएमसी बाजारात नित्याने ६००ते ६५० गाड्या आवक होते, गुरुवारी बाजारात ५५५ गाड्या दाखल झाल्या आहेत. टोमॅटो स्वस्त असून इतर भाज्यांची दरवाढ झाली आहे. वाटाणा, शिमला मिरची, गावर, भेंडी, काकडीच्या दरात अधिक वाढ झाली आहे. आधी घाऊक बाजारात भेंडी ४४ रुपयांवरून ५०रुपये, गवार ७०-७५रुपयांनी उपलब्ध होती ती आता ८०रुपये हिरवी मिरची ४८-५०रुपयांवरून ६०रुपये शिमला मिरची ३६रुपयांवरून ४२ रुपयांनी विक्री होत आहे.
भाज्यांचे आताचे / आधीचे दर
हिरवी मिरची – ६० / ४८-५०
शिमला- ४२ / ३६
काकडी – २४ / १६
भेंडी- ५०/ ४४
गवार- ८० /७०-७५
वाटाणा- ४०-६५ /२८-४०