जेएनपीटीतील अवजड वाहतुकीचा परिणाम; विद्यार्थी, कर्मचारी, प्रवासी त्रस्त

उरण-पनवेल मार्गावरील गव्हाण फाटा तसेच जासई नाका या दोन ठिकाणी सकाळी व सायंकाळी अशा दोन्ही वेळी दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या मार्गावरील विद्यार्थी, कर्मचारी तसेच सर्वसामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. ही कोंडी दूर करून येथील नागरिकांना दिलासा देण्याची मागणी वारंवार केली जात आहे. वाढती वाहने, अपघात व कोंडी या विरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.

जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या उरणमधील जेएनपीटी ते गव्हाण फाटा तसेच जेएनपीटी ते मुंबई-गोवा मार्गावरील पळस्पे अशा दोन्ही प्रमुख राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी डिसेंबर २०१८ पर्यंतची मुदत आहे. असे असले तरी आजही या मार्गावरील कामे अपूर्णच आहेत. त्यामुळे मार्गावर वारंवार कोंडी होत आहे. जासई नाका येथे जासईवरून गव्हाणला जाणाऱ्या जड वाहनांमुळे सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दास्तान ते करळ अशी जवळपास तीन किलोमीटरची रांग लागते. तर गव्हाण फाटा हे एक महत्त्वाचे जंक्शन असल्याने अनेक मार्गावरून येणारी वाहने या चौकात येतात. या चौकातही उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. उरण सामाजिक संस्थेने येथील मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी सुरू असल्याची माहिती संस्थेचे सचिव संतोष पवार यांनी दिली.