उरण: दास्तान दिघोडे मार्गावरील चिर्ले गावाजवळून होणाऱ्या कंटेनर वाहतुकीमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. याचा या मार्गावरील प्रवासी व शेजारील गावातील ग्रामस्थांच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यात मार्गावरील धोकादायक वळणामुळे भर पडली आहे. त्यामुळे ही कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाने मुख्य मार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण करण्याची मागणी होत आहे.
दास्तान ते दिघोडे हा एकेरी मार्गी रस्ता आहे. या रस्त्यावरून दिघोडे, वैश्वि, दादरपाडा, जांभुळ पाडा, विंधणे आदी गावाच्या हद्दीतील कंटेनर गोदामातून मालाची ने आण करणारी शेकडो वाहने दररोज ये जा करीत आहेत. या मार्गावरील रस्त्याला प्रचंड खड्डे पडले होते.
हेही वाचा… पनवेल पालिकेचे गोदाम चोरांनी लुटले
खड्डयांमुळे दुचाकी व लहान वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही प्रमाणात या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले आहे. त्यामुळे खड्ड्याच्या त्रासातून थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र वाढत्या अवजड कंटेनर वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.