उरण : आज निसर्ग आणि पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला असताना आदिम मानवी जीवनापासून रोजच्या वापरासाठी मातीच्या भांडय़ाचा वापर केला जात होता. मात्र सध्या यातील अनेक वस्तू प्लास्टिक, स्टील किंवा इतर धातूंपासून बनविण्यात येत असल्याने मातीच्या भांडय़ाची मागणी घटली होती. त्याच वेळी उरणच्या चिरनेरमधील मातीच्या वस्तूंना मागणी वाढली आहे. त्यामुळे येथील मातीच्या वस्तू बनविणाऱ्या कुंभार समाजाच्या व्यवसायाला नवीन ऊर्जा प्राप्त झाली आहे.

विशेष म्हणजे हा व्यवसाय येथील महिला करीत असल्याने महिलांना याचा फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे निसर्ग व पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मदत होणार आहे. चिरनेर गावात देखील ३२ कुटुंबांचा कुंभार समाजाच्या लोकांचा कुंभारपाडा असून यातील बहुतेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आजही याच मातीच्या भांडय़ांच्या व्यवसायावर चालतो. चिरनेरमधील ३२ कुटुंबीयांपैकी २९ कुटुंबांतील गृहिणींचा या व्यवसायात चांगलाच हातखंडा आहे. या व्यवसायातून प्रत्येक कुटुंबाला जवळजवळ १५  हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न दर महिन्याला मिळते. त्यामुळे कधीकाळी दारिद्र्यात खितपत पडलेली या मंडळीना आता सुखाचे दिवस आले आहेत. ही मंडळी दर संकष्टी चतुर्थीला गावातच लाखो रुपयांच्या मातीच्या भांडय़ांची व वस्तूंची विक्री करतात. 

कुंभार समाजाकडून उन्हाळय़ात मातीची मडकी, खापऱ्या, तव्या, जोगळय़ा, भीन, झाकणी, चुली आणि लहान मुलांची खेळणी बनविण्याचा व्यवसाय केला जातो. शेतातील काळय़ा मातीपासूनच हे कारागीर या वस्तू बनवितात. पूर्वीप्रमाणे चाकावरचे मातीकाम करणारी जास्त माणसे शिल्लक राहिली नसली तरी काही अशिक्षित महिला देखील हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत. ही मातीची भांडी तयार करण्यासाठी शेतातील काळी माती आणून ती एका खाडय़ात एक दिवस भिजत ठेवली जाते. नंतर ही माती एका खळय़ात काढून ती काही प्रमाणात सुकविली जाते नंतर त्या मातीत राख मिसळून ती माती मळली जाते. ही माती मळल्यानंतर त्यापासून आपल्याला हव्या त्या आकाराची भांडी बनविता येतात. नंतर ही भांडी एका भट्टीत ठरावीक    तापमानात भाजली जातात. सुकी लाकडे, तुस आणि पेंढा यांची ही भट्टी असते. ठरावीकच तापमानात ही भांडी भाजली नाही तर ती फुकट जातात. यानंतर ही भांडी विक्रीसाठी काढली जात असल्याची माहिती शकुंतला हरिभाऊ चिरनेरकर यांनी दिली. यामध्ये मातीच्या खापरी (तवा) याला येथील आगरी, कोळी, कराडी समाजाच्या लोकांकडून भरपूर मागणी असते. १५० ते २०० रुपयांपर्यंत एक खापरी विकली जाते. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये बहूतेक करून चिरनेर येथीलच खापऱ्या भाकऱ्या भाजण्यासाठी वापरल्या जातात. या व्यवसायामुळे येथील कुंभार समाजातील लोकांना चांगले दिवस आले आहेत.

Story img Loader