उरण : बुधवारी अरबी समुद्रात झालेल्या प्रवासी बोट अपघातानंतर वर्षानुवर्ष सुरू असलेल्या जलमार्ग आणि प्रवासी सुरक्षा ऐरणीवर आली आहे. यात समुद्रातील वाढत्या वर्दळीमुळे हा जलमार्ग धोकादायक बनू लागला आहे. अपघाताच्या घटनेनंतर शासनाकडून प्रवासी सुरक्षेची दक्षता घेतली जात आहे. यात जलमार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लाईफ जॅकेटची सक्ती करण्यात आली आहे. परंतु प्रवासी बोटीत जॅकेट असले तरी ते न घालताच प्रवास केला जात असल्याची स्थिती आहे. प्रवासी बोटीना सुरक्षेसाठी करण्यात आलेली सक्ती ही कायम राहणार का अशी शंका व्यक्त केली जात आहे.
अपघात झाला त्या मार्गावरून उरण, अलिबाग आणि नवी मुंबई येथील प्रवासी बोटी दररोज प्रवास करीत आहेत. यातील सर्व जलवाहतूक ही वर्षभर सुरू असते. मात्र या घटनेनंतर पुन्हा एकदा या जलमार्गावरील सुरक्षा ऐरणीवर आली आहे. उरणच्या मोरा ते मुंबई दरम्यानची जलवाहतूक पावसाळ्यातही सुरू असते. तसेच मुंबई ते अलिबाग दरम्यान जलसेवा आहे. मात्र चार महिने तुलनेने कमी प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. त्याचप्रमाणे पावसाळ्यातील बदलत्या हवामानामुळे ही सेवा खंडित करावी लागते. अशा स्थितीत ही समुद्रातील लाटांचा सामना करीत ही सेवा सुरू असते. त्याचप्रमाणे बेलापूर ते मुंबई अशीही जलसेवा आहे. यात जेएनपीए बंदर ते गेटवे ऑफ इंडिया अशी जलसेवा आहे. या जलसेवेचा उपयोग बंदरातील कर्मचारी व कुटुंबीय, तसेच येथील खासगी बंदर आणि बंदरावर आधारित उद्योगातील कामगार करतात. मात्र पावसाळ्यात येणाऱ्या महाकाय लाटांमुळे गेटवे वरील सर्व प्रकारची जलसेवा बंद केली जाते. ही सेवा पावसाळ्यात खवलेला समुद्र शांत झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत केला जातो. मात्र तो पर्यंत जेएनपीए बंदर मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गेट वे ऐवजी भाऊच्या धक्क्यापर्यंत प्रवास करता येतो.
हेही वाचा…एमआयडीसीकडून उरणमध्ये दोन दिवसांची पाणीकपात, दर मंगळवार आणि शुक्रवारी पाणीपुरवठा बंद
उरण ते अलिबाग दरम्यानच्या करंजा रेवस मधील जलसेवा पावसाळ्यात सुरू असते. त्यामुळे अलिबाग ते मुंबई असा प्रवास करणारे प्रवासी हे करंजा रेवस मार्गाने प्रवास करीत आहेत. तर नौदलाच्या उरणच्या करंजा ते मुंबई या मार्गावरही प्रवासी वाहतूक केली जात आहे.
महाकाय जहाजे
मोरा ते मुंबई आणि इतर मार्गाने ये जा करणाऱ्या मार्गावर जेएनपीए आणि मुंबई या दोन्ही प्रमुख बंदरातून ये जा करणारी महाकाय जहाजे ही प्रवास करीत आहेत. या दोन्ही बंदराचे चॅनल आहेत. प्रवासी बोटी प्रवास करीत असताना जर मालवाहू जहाज आले तर प्रवासी बोट थरथरते त्याचप्रमाणे बोट काही काळासाठी थांबवावी लागते. त्याचप्रमाणे इतर मालवाहतूक जहाजेही याच मार्गावरून येजा करीत आहेत. त्यामुळे प्रवासी बोटींना सुरक्षित मार्ग असावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.
बोट अपघात नंतर प्रवासी सुरक्षेसाठी लाईफ जॅकेटची सक्ती करण्यात आली असून मोरा आणि एलिफंटा या दोन्ही मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू आहे. नितीन कोळी, बंदर अधिकारी, मोरा