नवी मुंबई : ऑन लाईन कर्ज घेणे हे किती मनस्ताप देणारे ठरू शकते याचा अनुभव नवी मुंबईतील दोन कुटुंबांना आला आहे. यामध्ये तर एका कुटुंबाचा तर त्या कर्जाशी दुरान्वये संबंध नव्हता.
तक्रारदाराच्या पत्नीच्या मोबाईलवर तिचे आणि पतीच्या मित्राचे एकत्रित असलेले पाच अश्लील फोटो एका मोबाईल क्रमांकावरून आले होते. अर्थात फोटो बनावट होते, मॉर्फ करण्यात आले होते. पती हा कामाच्या ठिकाणी असल्याने तिने याबाबत तात्काळ फोटो पाठवले. याबाबत अश्लील फोटो ज्या मित्राच्या समवेत आले त्याला तक्रारदाराने विचारणा केली असता या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला.
हेही वाचा >>>जगप्रसिद्ध घारापुरी बेटावरील वीज पुरवठा अनियमित; नादुरुस्त वाहिन्या दुरुस्तीत पाऊस आणि भरती-आहोटीचे अडथळे
संबंधित मित्राने काही दिवसांपूर्वी ऑन लाईन कर्ज देणाऱ्या क्रेडिटबी (Kreditbee) या अॅप वरुन केवळ २ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र काही दिवसातच कर्ज फेडा म्हणून तगादा सुरु झाला. त्याच बरोबर कर्ज फेड केली नाही तर तुमचे तुमच्याच ओळखीच्या महिलेसोबत अश्लील फोटो व्हायरल करत बदनामी करण्यात येईल म्हणून धमकी देण्यात येत होती. ही धमकी खरी ठरली. असे फोटो त्यालाही पाठवण्यात आल्याची माहिती त्या मित्राने तक्रादाराला दिली.
हेही वाचा >>>उरण चिटफंड घोटाळा प्रकरणी पोलिसांकडून जमावबंदी आदेश
याबाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की कर्ज घेताना विविध माहिती भरत अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. पैशांची गरज असल्याने लोक करतातही. मात्र याच दरम्यान आपल्या मोबाईलमधील सर्व माहिती, विविध क्रमांक हे सायबर गुन्हेगार स्वतःकडे घेतात. याही प्रकरणात असेच झाले असून ज्यांनी कर्ज घेतले त्यांच्या मोबाईलमध्ये मित्राचा व त्यांच्या पत्नीचा मोबाईल क्रमांक होता. या माहितीचा वापर करत सदर महिलेस तिचे व कर्जदाराचे अश्लील बनावट फोटो काढून पाठवले.
या सर्व प्रकरणाबाबत नवी मुंबईच्या एआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सायबर विभाग करत आहे.