नवी मुंबई: ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या न सुटल्यास ९ ऑगस्टपासून महापालिका मुख्यालयासमोर बेमुदत लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा काही दिवसापूर्वी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिला होता. मात्र त्यावर कुठलाही निर्णय न झाल्याने आजपासून बेमुदत लाक्षणिक उपोषणास सुरुवात झाली आहे. हे आंदोलन नवी मुंबई मनपा मुख्यालयासमोरच करण्यात येत आहे.
ठोक मानधनावर असणाऱ्या कामगारांना तुटपुंज्या वेतनावर भागवावे लागत आहे. कायम कामगार आणि ठोक मानधनावरील कामगार यांच्या वेतनात ४० ते ६५ टक्क्यांचा फरक आहे. ठोक मानधनावर असणाऱ्या लोकांना निदान नवी मुंबईत व्यवस्थित राहता येईल एवढे तरी वेतन द्यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. यासाठी अनेक आंदोलने, शिष्ट मंडळ सोबत चर्चा, आश्वासने झाली मात्र अद्याप वेतन वाढ झाली नाही. त्यामुळे इशारा दिल्या प्रमाणे इंटक संघटनेने क्रांती दिन अर्थात ९ ऑगस्ट पासून बेमुदत लाक्षणिक उपोषण आंदोलन मनपा मुख्यालयासमोरच सुरु केले आहे.
हेही वाचा… उरणमध्ये मोदी सरकार विरोधात डाव्यांची निदर्शने
कामगारांना नवी मुंबईत राहू शकतील इतपत सुद्धा वेतन मिळत नाही. या शिवाय आजारपणातील रजा, अपघात विमा, तसेच काम सुरु असताना काही दुर्दैवी घटना घडली तर कायम कामगारांना व नातेवाईकांना जे फायदे मिळतात ते ठोक मानधना वरील कामगारांना मिळत नाहीत. त्यामुळे बेमुदत लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे . जो पर्यंत मागण्या लेखी मान्य होत नाहीत तो पर्यत उपोषण चालणार आहे. अशी माहिती अशी माहिती नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी दिली.