लोकसत्ता टीम
उरण : तालुक्यातील जासई,चिरनेर व दिघोडे या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूका ५ नोव्हेंबरला होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत थेट पक्ष नसले तरी गावातील स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते पक्ष म्हणून एकत्र येऊन निवडणूक लढवितात. यामध्ये देशपातळीवर असलेल्या सत्ताधारी भाजप आणि विरोधातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षात ही निवडणूक लढली जाणार असल्याचे चित्र आहे.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी उरण नगरपरिषदेच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. या निवडणुकीतील उमेदवार आणि समर्थकांनी आणलेल्या चारचाकी वाहनांमुळे उरण शहरातील एन. आय .हायस्कूल ते पंचायत समिती व स्वामी विवेकानंद चौक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. याचा फटका येथील सर्वसामान्य नागरिकांना बसला.
आणखी वाचा-नवी मुंबई : चरस विक्री प्रकरणी एकास अटक
तीन ग्रामपंचायतीच्या १५ प्रभागातील ४१ जागांसाठी व सरपंच पदांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये जासई ग्रामपंचायतीच्या ६ प्रभागातील १७,चिरनेर मधील ५ प्रभागातील १५ तर दिघोडे मधील ३ प्रभागातील ९ जागांसह थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. उरणच्या आर्थिकदृष्ट्या व उरण विधानसभा मतदारसंघातील महत्वपूर्ण आशा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उरणचे भाजपचे आमदार महेश बालदी हे मैदानात उतरले आहेत. तर उरण मधील शेतकरी कामगार पक्ष,शिवसेना(ठाकरे),काँग्रेस व राष्ट्रवादी(शरद पवार)हे पक्ष इंडीया आघाडी म्हणून ही निवडणूक लढवीत आहेत.
सर्व पक्षांसाठी महत्वपूर्ण निवडणूक
२०२४ हे लोकसभा,विधानसभा यांच्या निवडणुकांचे वर्ष आहे. तर नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती यांच्याही निवडणूका पूर्वी ही निवडणूक होत असल्याने सर्व पक्षांसाठी दिशा दर्शक ठरणार आहे.