उरणच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात सहाय्यकाच्या कमतरतेमुळे दररोज शवविच्छेदनासाठी दाखल होणाऱ्या प्रेताची तोडणी- जोडणीचे काम वार्डबॉयना करावे लागत आहे.तसेच रुग्णालयातील भेडसावणाऱ्या अनेक उणीवांमुळे उपचारासाठी रूग्णांना इतरत्र पाठविण्यात येत असल्याने गरीब गरजू रुग्णांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.उरणच्या सुमारे दोन लाख नागरिक व दररोज उपचारासाठी येणाऱ्या गरीब गरजू सध्या तरी येथील ३० खाटांचे शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय एकमेव आधार आहे.उरण परिसरातील दररोज सुमारे १५० ते २०० ब गरीब-गरजू रुग्ण रुग्णालयात दाखल होतात.रुग्णालय सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरता आणि रुग्णालयातील अनेक गैरसोयींमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.या रुग्णालयाला याआधी कधीही पुर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक नियुक्त करण्यात आलेला नव्हता.मात्र यावेळी मात्र आरोग्य विभागाने महिनाभरापूर्वीच पुर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर असतानाही एका कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टर व्यतिरिक्त फक्त एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> वाशी टोल नाका की वाहतूक कोंडी नाका?; टोलनाक्यावरील १८ पैकी २ लेन बंद; वाहतूक कोंडीत भर
एक पद अद्यापही रिक्त असल्याने वाढत्या बाह्य रुग्णांचा ताण२४ तास एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पडत आहे. महिन्यात सुमारे ४० ते ४५ प्रसृतीच्या केसेस दाखल होतात.मात्र रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे गुंतागुंतीच्या अनेक केसेस उपचारासाठी पनवेल, वाशी, मुंबईकडे पाठविण्यात येतात. रुग्णांसाठी एक्स- रे मशिन आहे.मात्र काम करण्यासाठी टेक्निशियनच नसल्याने एक्स- रे मशिन धुळखात पडली आहे.दोन ॲम्ब्युलन्स आहेत.मात्र वाहन चालक एकच आहे.त्यामुळे ऐनवेळी रुग्णांना ॲम्ब्युलन्ससाठी धावपळ करावी लागते.वार्डबॉय, सफाई कामगारांच्या सात मंजूर जागांपैकी तीन जागा रिक्त आहेत.या रिक्त जागांमुळे रुग्णालयाची साफसफाई, रुग्णालयाच्या वार्डातील कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबईत पाणीचोरीला बसणार पायबंद ; मूळ गावठाण , झोपडपट्टीधारक येणार पाणीमीटरच्या कक्षेत
उरण परिसरातील वाढत्या औद्योगिक पसाऱ्यामुळे अपघाताची संख्या वाढत चालली आहे.दररोज एक-दोन प्रेतं शवविच्छेदनासाठी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात येतात.मात्र उरणसाठी एकमेव असलेल्या शवविच्छेदन इमारतीची दुरवस्था झाली आहे.छत धोकादायक झाल्याने कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.यावर कहर की काय शवविच्छेदन करण्यासाठी सहाय्यकच उपलब्ध नसल्याने दररोज शवविच्छेदनासाठी दाखल होणाऱ्या प्रेताची तोडणी- जोडणीचे काम वार्डबॉयना करावे लागत आहे.त्यामुळे मरणानंतरही प्रेताला यातना भोगाव्या लागत आहेत.यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
हेही वाचा >>> नवी मुंबई : तुर्भे वाहतूक पोलीस भोगताहेत नरकयातना
रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या परिसरातील शेकडो रुग्णांचे आरोग्य जपण्यासाठी नियुक्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दररोज कसरत करावी लागत आहे. उरणच्या शहरी व ग्रामीण जनतेसाठी उपयुक्त असणाऱ्या एकमेव ३० खाटांच्या शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय सध्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरता आणि रुग्णालयातील अनेक गैरसोयींमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.रुग्णालयाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी रिक्त पदे तत्काळ भरण्याची आवश्यकता आहे. गैरसोयी दूर करण्याची गरज आहे. यासाठी रुग्णालयाकडून आरोग्य विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.