औद्योगिक प्रदूषणाने त्रस्त; सर्वाधिक महसूल देऊनही सुविधांचा दुष्काळ

प्रभाग फेरी : प्रभाग क्र. २

रायगड जिल्ह्य़ातील सर्वात मोठय़ा तळोजा औद्योगिक वसाहतीचा बराचसा भाग प्रभाग क्रमांक २ मध्ये येतो. या प्रभागातून मोठय़ा प्रमाणात महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा होतो. या प्रभागातील तोंडरे, पालेखुर्द, पडघे व नावडे या गावांतील रहिवासी गेल्या २५ वर्षांपासून औद्योगिक वसाहतीमुळे होणाऱ्या प्रदूषणाने हैराण झाले आहेत.

औद्योगिक वसाहतीमुळे या परिसरात परराज्यांतून स्थलांतरित झालेले मजूर मोठय़ा प्रमाणात खोल्या भाडय़ाने घेऊन राहतात. येथे अनेकांचा उदरनिर्वाह भाडय़ाने दिलेल्या खोल्यांच्या उत्पन्नावर आणि कामगारांना लागणाऱ्या किराणा समानाच्या विक्रीतून होतो. पनवेल पालिकेच्या स्थापनेनंतर या परिसरातील प्रदूषणावर नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने कठोर पावले उचलून येथील प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे अशी येथील रहिवाशांची अपेक्षा आहे. दिल्लीत जी प्रदूषण मोजणारी यंत्रणा आहे त्याच धर्तीवरील यंत्रणा या भागात उभारावी अशी रहिवाशांची मागणी आहे. यापूर्वी या परिसरात मोठय़ा प्रमाणात वायुगळती, आगीच्या घटना घडल्या आहेत. नागझरीची लोकसंख्या कमी असली तरी या गावांमध्ये मुलांसाठी माध्यमिक शाळा सुरू करावी अशी पालकांची मागणी आहे. सध्या या गावातील मुले शिक्षणासाठी नितळस गावाच्या शाळेत जातात. पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट आहे.

नव्या महापालिकेने घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. चाळ या गावामध्ये ५० घरे असून येथे रात्रीच्या प्रदूषणाचा मोठा त्रास ग्रामस्थांना जाणवतो. येथे औद्योगिक विकास महामंडळाने पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. तोंडरे, पालेखुर्द, देवीचापाडा येथे औद्योगिक वसाहतीमुळे चांगले रस्ते आणि सुसज्ज परिवहन व्यवस्था आहे. मात्र या परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी नावडे येथे जावे लागते. औद्योगिक वसाहतींमधील कारखान्यांचा सामाजिक सेवेसाठीचा निधी वापरून येथील ग्रामस्थांच्या पिढीसाठी तंत्रशिक्षण महाविद्यालय असावे, अशी येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

प्रभाग क्रमांक दोनमधील सर्वात मोठी बाजारपेठ देवीचा पाडा या गावात आहे. त्यात सुमारे १५० दुकाने आहेत. पडघे व नावडे ही गावे कासाडी नदीतील जलप्रदूषणामुळे हैराण झाली आहेत. मागील पाच वर्षांत नावडे गावाजवळ सिडको प्रशासनाने उभारलेल्या वसाहतीमुळे येथील लोकवस्ती झपाटय़ाने वाढली. याच लोकवस्तीने येथील प्रदूषणाकडे पर्यावरण विभागाचे राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचे लक्ष वेधले. राज्यमंत्री पोटे यांनी वर्षभरात प्रदूषण कमी करतो हे आश्वासन नावडे गावातील नागरिकांना दिले आहे. या परिसरात भंगारमाफियांचा वावर असल्याने येथे भंगारचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालतो.

पडघे गावातील नागरिकांना शीव-पनवेल महामार्ग आणि खारघर व मानसरोवर रेल्वेस्थानकांत पोहोचणे सोपे व्हावे यासाठी सिडको प्रशासनाने रोडपाली येथील फूडलॅण्ड कंपनीजवळ नवीन उड्डाणपूल बांधला. या पुलामुळे गावाच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र या मार्गावर अजून बससेवा सुरू झालेली नाही, अशी खंत पडघेतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. औद्योगिक वसाहतीसाठीची बससेवा या मार्गावरही देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. तसेच फुडलॅण्ड कंपनीचा उड्डाणपूल जिथे संपतो, तेथून गावाच्या वेशीपर्यंत जाण्यासाठी पक्का डांबरी रस्ता सिडको प्रशासनाने गेल्या २० वर्षांत बांधलेला नाही.

मेट्रोचा तिसरा टप्पा पेणधर ते कळंबोली पडघे गावांच्या माथ्यावरून जाणार आहे. त्याचे भूमिपूजन पाच वर्षांनंतरही सिडकोने केलेला नाही. वलप, पडघे, नावडे या गावांत कासाडी नदीचे पात्र प्रदूषित आहे. त्यावर मात करण्यासाठी पालिकेने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

सरकारी रुग्णालय नाही

या परिसरात सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. तेथे वर्षांला सुमारे ६० आगीच्या घटना घडतात, मात्र दुर्घटनांत जखमी होणाऱ्या कामगारांसाठी सरकारी रुग्णालय नाही. त्यामुळे प्राण वाचविण्यासाठी वसाहतीपासून १५ किलोमीटरवरील कामोठे येथील एमजीएम रुग्णालय किंवा ३५ किलोमीटरवरील वाशी रुग्णालय गाठावे लागेत. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीचा परिसर कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या नियंत्रणाखाली चालतो. वसाहतीमध्ये सुमारे ५० हजार कामगार काम करतात. येथील कारखानदार कामगारांच्या विम्यासाठी दर वर्षी हजारो कोटी रुपये महामंडळाकडे जमा करतात. त्यामुळे येथे सरकारी रुग्णालय नाही. त्यामुळे या परिसरात १०० खाटांचे रुग्णालय असावे, अशी मागणी उद्योजकांच्या संघटनेने वेळोवेळी केली आहे.

प्रभागाची व्याप्ती

रायगड जिल्ह्य़ाच्या उत्तरेकडील वेशीवर असणारी नागझरी व चाळ ही पनवेल तालुक्याच्या टोकावरील गावे आहेत. या गावांपासून हा प्रभाग सुरू होतो. तळोजा औद्योगिक वसाहतीतील चाळ, तोंडरे, पालेखुर्द व देवीचा पाडा या औद्योगिक वसाहतीलगत असणाऱ्या गावांसह या प्रभागात पडघे व नावडे ही मोठी गावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

देवीचा पाडा येथे पाणीटंचाई

देवीचा पाडा या गावातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या प्रतीक्षेत तेथील रहिवासी आहेत. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी पालिकेकडे निवेदने दिली आहेत. गावातील पाणी वापरावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने येथे मोठय़ा प्रमाणात पाण्याचा अपव्यव होतो. या परिसरात पाण्याच्या मीटरपद्धतीला ग्रामस्थांचा विरोध आहे. यापूर्वी या परिसरातील गावांचा कारभार ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली होत असे. ग्रामस्थ पाणीपट्टी भरत. रात्री भाडेकरूंनी आणि दिवसा घरमालकांनी पाणी भरावे, अशी येथील प्रथा होती. पालिकेच्या स्थापनेनंतर येथे पाणीपुरवठा कमी प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

 

२५८४७ लोकसंख्या

१३८८५ एकूण मतदार

५८३१ स्त्री मतदार

८०५४ पुरुष मतदार

Story img Loader