सिडकोने वसवलेल्या नवी मुंबईत वाचन, साहित्य, कला-संस्कृतीचे जतन करण्यासाठी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाशीत ऑक्टोबर १९७४मध्ये टाउन लायब्ररीची स्थापना करण्यात आली. शहरातील इमारती आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत असताना टाउन लायब्ररी वाचन संस्कृतीचा वसा गेली ४४ वर्षे सातत्याने पुढे नेत आहे.
टाउन लायब्ररी, वाशी
नवे शहर, नवी माणसे, नव्या ओळखी अशा वातावरणात पी. आर. मांडे, वाय. पी. जोशी, एस. डी. चौगुले यांच्यासह एकूण ८ जणांनी एकत्र येऊन ऑक्टोबर १९७४मध्ये टाऊन लायब्ररीची स्थापना केली. वाशीतीलच मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळात ५ वर्षे आधीच या ग्रंथालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. सुरुवातीला वाशी सेक्टर १ व सेक्टर ६मधील ग्रंथप्रेमींनी सभासदत्व घेतले. घरोघरी जाऊन पुस्तके गोळा करून वाटचाल सुरू झाली. सुरुवातीला फक्त ४० सदस्य होते. नवी मुंबई हायस्कूल वाशी जवळील जुन्या कम्युनिटी सेंटरमध्ये १५०० चौरस फूट जागेत ग्रंथालय सुरू झाले. १९८६पर्यंत हे ग्रंथालय तिथेच होते. शुल्क अतिशय नाममात्र होते. त्या इमारतीत तेव्हा फक्त सिडकोचे शिवणवर्ग व ग्रंथालय होते.
सुरुवातीला अगदी मोजकीच पुस्तके असलेल्या या ग्रंथालयात सध्या ३१ हजार १५३ पुस्तके आहेत. ३ कर्मचारी आहेत. तेव्हा वाचनालयाकडे ३०० पुस्तके असतील तर ‘ड’ वर्ग अनुदान मिळायचे. स्थापनेच्या पुढच्याच वर्षी ‘ड’ वर्ग मिळाला व अनुदान सुरू झाले. १९८६ नंतर ग्रंथालय सिडकोच्या नवीन कम्युनिटी सेंटरमध्ये तळमजल्यावर स्थलांतरित करण्यात आले. दुसऱ्या मजल्यावर ग्रंथालयाचे विविध कार्यक्रम होत. विजय तेंडुलकर, विश्वास पाटील, अनंत सामंत, गिरिजा कीर, राजा राजवाडे, स्मिता राजवाडे, मधुमंगेश कर्णिक, प्रमोद कर्नाड अशा अनेक मान्यवरांचे कार्यक्रम तिथे झाले. या इमारतीत साहित्य, कला, संस्कृतीशी संबंधित नऊ संस्था होत्या आणि त्यांचे एकत्रित भाडे अवघे १०० रुपये होते.
सिडकोने शहराच्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी सामाजिक सेवा विभाग सुरू केला. तेव्हा वाशीतील सर्वपरिचित ठिकाण म्हणजे टाऊन लायब्ररी होते. नवोदित कवींना येथे व्यासपीठ मिळाले. याच काळात सुरू झालेल्या अभ्यासिकेत अभ्यास करून अनेकांनी यशाची शिखरे सर केली. विविध कार्यक्रमांचा रसास्वाद घेतला. नंतर सिडकोने हे कम्युनिटी सेंटर नवी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित केले. पालिका स्थापन होण्यापूर्वी शहराच्या जडणघडणीला हातभार लावणाऱ्या संस्थांत टाउन लायब्ररीचा समावेश होता.
कळंबोली येथील सिडकोच्या कम्युनिटी सेंटरमध्ये टाउन लायब्ररीची एक शाखा सुरू आहे. पालिकेने वाशीतील पोलीस ठाण्याजवळील कम्युनिटी सेंटरच्या जागेवर नवीन इमारत बांधण्यासाठी २०१४ला इमारत रिकामी करण्याची नोटीस ग्रंथालयाला पाठवली. पालिकेने शिरवणे येथील नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान येथे जागा दिली. त्याचे भाडे संस्था पालिकेला देत आहे.
नव्या इमारतीत जुन्या संस्थांना जागा देण्यात येईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. वाशीतून शिरवणेत स्थलांतर करून टाउन लायब्ररी चालवणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे तिथे २८ हजार पुस्तके व व फर्निचर ठेवून संस्थेने २०१४पासून वाशीतच बी ३ टाईपमध्ये ४ क्रमांकाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर ग्रंथालय सुरू केले. साहित्य साधनेचे काम सभासदांच्या जोरावर पुन्हा जोमाने सुरू झाले आणि सुरू आहे.
आजही ग्रंथालयात वाचकांची वर्दळ असते, हेच या संस्थेच्या यशाचे गमक आहे. लायब्ररीचे सध्या ९०० सदस्य असून अध्यक्षा डॉ. सुप्रिया काशिद, सचिव विजय केदारे, खजिनदार विवेक भगत वाचनसंस्कृती अधिकाधिक विकसित करण्यासाठी झटत आहेत. पालिकेने दिलेल्या जागेचे आणि सध्या जिथे ग्रंथालय आहे त्या जागेचे असे एकूण २० हजार रुपये भाडे दरमहा भरावे लागत असल्यामुळे ग्रंथालयाची आर्थिक ओढाताण होत आहे. पालिकेची वास्तू तयार झाल्यावर पुन्हा भरारी घेण्याची जिद्द पदाधिकारी आणि सदस्यांत आहे.
ग्रामीण ग्रंथालयांना मदतीचा हात
ग्रामीण भागांतील वाचनालयांना आधार देण्यासाठी विविध पुस्तके देण्याचे कार्य टाउन लायब्ररी अनेक वर्षांपासून करत आहे. काव्यवाचनाचे कार्यक्रम करून नवोदित कवींना प्रोत्साहन देण्याचा आणि सदस्यांना सकस साहित्य मिळवून देण्याचा प्रयत्न संस्था नेहमीच करते. महाराष्ट्र नाटय़ स्पर्धेत टाउन लायब्ररीचे सदस्यांनी २०१४-१५ मध्ये बादल सरकार यांचे ‘सारी रात’ हे नाटक मराठी व हिंदीमध्ये सादर करून पारितोषिक मिळवले होते. २०१५-१६मध्ये सादर केलेल्या विवेक भगत लिखित ‘कसक’ या नाटकाला पारितोषिक मिळाले होते.
संतोष जाधव – santoshnjadhav7@gmail.com