नवी मुंबई : वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात ‘शेती उत्पादक संघ व नवोदित शेती तंत्रज्ञान संस्थांना पूरक व्यावसायिक व्यासपीठ निर्मिती’ होईल या दृष्टीने किसान बीझ कृषी-व्यवसाय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. बॉम्बे चेंबर कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि किसान फोरमने याचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय प्रदर्शनात १६० शेती उत्पादक संघ व नवोदित शेती तंत्रज्ञान वितरण संस्थांनी सहभाग नोंदविला असून हे भव्य प्रदर्शन व्यासपीठ नैसर्गिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान कृषी व्यवसायाला पूरक ठरत आहे.
हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
पहिल्यांदाच कृषी व्यवसायिक तंत्रज्ञांची व्यापकता वाढवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलेली आहे .यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या, सरकारी उपक्रम, ड्रोनटेक, स्टार्ट अप्स, वित्तीय संस्था, कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि काढणीनंतर शेतमालावर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया या संबंधित कंपन्यांनी आपले प्रदर्शन मांडले होते . या प्रदर्शनात सेंद्रिय खत निर्मितीतून उत्पादित करण्यात आलेले अन्नधान्य, भाजीपाला, कांदा बटाटा, फळे याबाबत स्टॉल लावण्यात आले होते.
यामधून अतिरिक्त रासायनिक खतांचा मारा न करता सेंद्रिय , नैसर्गिक खतांचा वापर करून उच्चतम दर्जाचा शेतमाल उत्पादित करू शकतो याबाबत माहिती देण्यात आली. तसेच देशी बियाणांच्या वाणांचा वापर करूनही चांगल्या दर्जाचे अन्नधान्य उत्पादित करता येते आणि ते कशा पद्धतीने आरोग्यदायी आहे, त्यातून उत्पन्न ही कसे वाढविता येईल, याबाबत माहिती देण्यात आली.
याच पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर कमी वेळात, कमी श्रमदानातून मोठ्या प्रमाणावर उत्पादन कसे घेता येईल? याची माहिती देण्यात आली. ड्रोनच्या साह्याने एक किलोमीटर पर्यंत औषध फवारणी किती सहज सोप्या पद्धतीने करता येईल याची माहिती दिली. या प्रदर्शनाला जवळ जवळ ५ ते १० हजार जणांनी भेटी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एकंदरीत शेतकरी संस्था ,कृषी व्यवसाय संघ, पुरवठादार , वितरक आणि अन्य सरकारी कृषी कंपन्यांना हे प्रदर्शन आणखी लोकांपर्यंत पोहोचण्याचे, कृषी व्यवसायाची व्याप्ती वाढवण्यासाठी उत्तम माध्यम ठरले आहे.