ऐरोली रेल्वे स्थानकातील पोलीस आणि स्थानिक पोलीस यांच्या वादात एका तरुणाचा उपचाराअभावी दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका २५ वर्षीय तरुणाला अचानक रक्ताची उलटी आली. यावेळी त्याला मदत करण्यासाठी अनेक नागरिक पुढे सरसावले. याची माहिती नागरिकांनी ऐरोली रेल्वे पोलिसांना दिली. परंतु हा प्रकार रेल्वे स्थानकाबाहेर घडल्याने स्थानिक पोलिसांना याची माहिती द्यावी, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. हद्दीचा हा वाद तासभर चालल्याने या तरुणाला तब्बल तासभर उपचाराअभावी पडून राहावे लागले. हद्दीच्या या वादात पोलिसांमध्येही संभ्रम होता. स्थानिक पोलीस रेल्वेकडे मेमोची मागणी करत होते. मात्र स्टेशन मास्तर त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. अन्य कर्मचारीही जबाबदारी घेण्यास तयार नव्हते. स्थानिक पोलिसांनी अखेर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात या तरुणाला दाखल केले, मात्र त्याला वाचविण्यात डॉक्टरांना अपयश आले.रेल्वे अधिकारी संदीप पाटील म्हणाले की, रेल्वेची हद्द ही फक्त रेल्वे स्थानकांच्या अंतर्गत आहे. स्थानकाबाहेर काही झाल्यास स्थानिक पोलिसांनी लक्ष देण्याची गरज आहे.