सिडकोच्या ना-हरकत प्रमाणपत्राची प्रतिक्षा; पहिल्या मजल्यावर तलाव; तळमजल्यावर एनएमएमटी बसआगार
नवी मुंबई : गेली वीस वर्षे रखडलेला वाशी जुईगाव येथील आंतरराष्ट्रीय तरण तलावाचे काम यंदा मार्गी लागण्याची शक्यता आहे. एनएमएमटी बस आगार आणि पालिकेचे स्वतंत्र असलेले दोन भूखंड एकत्र करून या ठिकाणी सुमारे अडीच एकर जमिनीवर हा तरण तलाव बांधला जाणार असून त्यासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पहिल्या मजल्यावर बांधण्यात येणाऱ्या या तलावाच्या तळमजल्यावर एनएमएमटीचे बसआगार राहणार आहे.
नवी मुंबई पालिका स्थापनेला यंदा २८ वर्षे पूर्ण झाली पण पालिकेचा सर्वसामान्यासाठी तरण तलाव नाही. या उलट शेजारच्या मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवली पालिकांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय तरण तलाव नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. नवी मुंबई पालिकेने सर्वप्रथम वाशी सेक्टर १२ मध्ये या आंतरराष्ट्रीय तरण तलावाची मुहूर्तमेढ रोवली होती पण सिडकोने या विस्तीर्ण भूखंडातील अर्धा भाग एका खासगी विकासकाला विकल्याने हा प्रकल्प गेली वीस वर्षे रखडलेला आहे. त्यानंतर याच भूखंडातील पाच हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भाग हा पालिकेने अद्ययावत एनएमएमटी बस आगारासाठी राखून ठेवला आहे. वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढणारी प्रवाशी संख्या पाहता विद्यमान वाशीतील बस आगार अपुरे पडत आहे. त्यामुळे याच डेपोपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या या जागेत एनएमएमटी डेपोचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पाच हजार १०० चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अद्याप मोकळा आहे. त्यामुळे दोन भूखंड एकत्र करून तयार होणाऱ्या अडीच एकर भूखंडावर पालिकेचा महत्त्वाकांक्षी तरणतलाव प्रकल्प उभारला जाणार आहे. घणसोली येथील सावली उद्यानात एक तरण तलाव बांधण्यात आला आहे, पण तो आंतरराष्ट्रीय नसल्याने वाशीत आंतरराष्ट्रीय तरण तलाव बांधण्याचा पालिकेचा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. त्यासाठी
४० कोटी रुपयांचा खर्च होणार असून एनएमएमटीच्या बस डेपोची तरतूद या आराखडय़ात करण्यात आली आहे.
वाशीत नाटय़गृह असल्याने ऐरोलीत एक नाटय़गृह बांधण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे घणसोलीत छोटा तरण तलाव बांधल्यानंतर आता वाशीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय तरण तलाव बांधण्याचे काम यंदा हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी सिडकोच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
– सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका