तरुणांना रोजगार मिळविताना निवडप्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी तसेच मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा नोकरीसाठी स्वत:चे माहितीपत्र (बायोडेटा) पाठविताना त्यामध्ये कोणत्या बाबी असाव्यात इत्यादीचे मार्गदर्शन करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पुढाकार घेतला आहे. रोजगारातील संधी स्थानिक पातळीवरील तरुणांना मिळावी यासाठी शेकापने ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिक्रुटमेन्ट सेल स्थापन केले आहे. मुलाखतीला जाताना तयारीने जा, या सेलचे उद्घाटन इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ नॉलेज अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंटचे संस्थापकीय अध्यक्ष रामकृष्ण राऊळ यांच्या हस्ते येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात करण्यात आले. या कार्यक्रमास शेकापच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्रलेखा पाटील, नवी मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव डॉ. राजेंद्र गुप्ता, इन्स्टिटय़ूट ऑफ इंडस्ट्रीज इलेक्ट्रोनिक्स इंजिनीयर्सचे सदस्य अवाब फकी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पनवेल तालुक्यामध्ये विमानतळ प्रकल्पासोबत अनेक नवीन प्रकल्प येत आहेत. त्यामध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारांसाठी स्थानिकांसोबत पनवेलच्या सिडको वसाहतींमध्ये राहणारा तरुणवर्ग पात्र ठरावा यासाठी शेकापने या सेलची निर्मिती केली आहे. कुशल कामगार कसे बनावे, व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा करावा याचे धडे या सेलमध्ये मोफत मिळणार आहेत. तसेच मुलाखतीसाठी पूर्वतयारी कशी करावी, मुलाखतीचा अर्ज कसा लिहावा यासह नवीन सरकारी व खासगी नोकर भरतीची तयारी उमेदवारांकडून करून घेण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबीर येथे मोफत घेतले जाणार आहेत. हे सर्व मागदर्शन नामांकित कंपन्यांमधील मान्यवर तज्ज्ञ करणार आहेत.
केंद्रीय व राज्यस्तरीय नोकरभरतीच्या प्रक्रियेची माहिती या सेलमधून उमेदवारांच्या मोबाइल आणि इमेलवर पुरविली जाणार आहे. या सेलच्या अध्यक्षा अनुराधा ठोकळ असून जगदीश पवार हे उपाध्यक्ष तर प्रकाश म्हात्रे सचिव आहेत.
शेकापच्या पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवार ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिक्रुटमेन्ट सेलसाठी अर्ज नोंदणी करू शकतील. अर्ज नोंदणीचे कोणतेही शुल्क लागणार नाही. तसेच याच ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांकडून उमेदवारांची कागदपत्रे साक्षांकित केली जातील. नोंदणीनंतर सेलचे प्रतिनिधी संबंधित उमेदवारांचे गट बनवतील. उमेदवारांचे गट झाल्यानंतर मागणीप्रमाणे संबंधित विषयातील मान्यवरांचे मोफत प्रशिक्षणाचा दिवस ठरेल.