नवी मुंबई : वाशी मुंबई कृषि उत्पन्न फळ बाजारात १७ नोव्हेंबरला २०२२ ला मोठी आगीची घटना घडली होती. या घटनेदरम्यान एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणावर गाळधारकांकडून अतिक्रमण होत असून, सक्षम अग्निशामक यंत्रणादेखील नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे बाजार समितीने प्रत्येक बाजाराचे उपसचिव, तसेच इतर अधिकाऱ्यांसमवेत समिती गठीत करून अहवाल सादर करण्याचे निश्चित केले होते. हा अहवाल पंधरा दिवसांत सादर करण्यात येणार होता. परंतु, आता तीन महिन्यांचा कालावधी उलटला असून, अहवाल अद्याप गुलदस्त्यात ठेवला आहे.
एपीएमसी बाजार समितीत वारंवार आगीच्या घटना तसेच चोरीच्या घटनादेखील घडत असतात. त्यात बाजारात सक्षम अग्निसुरक्षा नाहीच, शिवाय सीसीटीव्ही यंत्रणाही नाही. मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करून, तसेच वाढीव जागेचा वापर करून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे बाजारात रहदारीसाठी सुटसुटीत जागा कमी असल्याचे निदर्शनास येते. त्याचबरोबर बाजारात मोठ्या प्रमाणावर गाड्यांची वर्दळ असते. फळ बाजारात हापूस हंगामात मोठ्या प्रमाणावर लाकडी पेट्या, पुठ्ठे, गवत यांचा समावेश असतो. तीन महिन्यांपूर्वी फळ बाजारात मोठा अग्नितांडव पाहायला मिळाला होता. ही आग पुठ्ठे आणि अतिक्रमणामुळे अधिक दूरवर पसरली होती. त्यामुळे या घटनेचा पाहणी दौरा करून एपीएमसी बाजार प्रशासनाने पाच बाजारातील अधिकाऱ्यांसमवेत समिती गठीत करून एपीएमसीतील अग्निसुरक्षेसह इतर सुरक्षिततेच्या बाबतीत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
हेही वाचा – उरणच्या चिटफंडचा सूत्रधार रॉबिनहूड? न्यायालयात समर्थकांची तुफानगर्दी
हेही वाचा – वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून अश्लील मेसेज पाठवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
पाचही बाजारांतील उपसचिव यांच्याकडून पाहणी दौऱ्यातून केलेला टिप्पणी अहवाल एपीएमसी कार्यकारी अभियंता सुरेश मोहडे यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. परंतु, अभियंत्याकडून अद्याप अहवाल सादर करण्यास विलंब का केला जात आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. एपीएमसी बाजारात बहुतांश व्यापाऱ्यांकडून गाळ्याव्यतिरिक्त वाढीव जागेचा वापर करून अतिक्रमण केले गेले आहे. त्यामुळे या अतिक्रमणावर पांघरून घालण्यासाठी एपीएमसी प्रशासन अहवाल सादर करण्यास विलंब करत आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.