नवी मुंबई मनपामध्ये लोकप्रतिनिधी नसल्याने काही अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. करोना आणि त्या नंतरच्या काळात कुठल्या अधिकाऱ्यांच्या आप्त स्वकीय लोकांना कंत्राट दिली गेली याची चौकशी गरजेची आहे. स्थानिक कंत्राटदार जगणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी केले आहे. आज वाशीत झालेल्या नवी मुंबई बचाव परिषदमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा- नवी मुंबई : पर्यटक ऐरोलीतील सागरी जैवविविधता केंद्रातील फ्लेमिंगो बोटींगच्या प्रतिक्षेत
भूमिपुत्रांनी शासनाला दिलेल्या जमिनीवर नवी मुंबई शहर हे वसले आहे. मात्र सध्या भूमिपुत्रांवर अन्याय होत आहे. त्यामुळे माजी विरोधीपक्ष नेते दशरथ भगत यांच्या पुढाकारातून नवी मुंबई कॉन्ट्रॅक्टर वेल फेअर असोसिएशन द्वारा “नवी मुंबई बचाव” परिषदेचे आयोजन वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात केले होते. या परिषदेत ७५ पेक्षा अधिक भूमिपुत्र कंत्राटदार उपस्थित होते. परिषदेला मार्गदर्शन करताना नाईक यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढले मात्र अनेक अधिकारी चांगले काम करत असल्याचेही सांगितले. करोना प्रादुर्भावमुळे मनपाच्या निवडणुका लांबणीवर पडत आहेत. दोन वर्षापासून मनपाचा गाडा प्रशासक ओढत आहेत. याचा गैरफायदा घेत अनेक अधिकारी आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणावर कामे देत आहेत. केवळ पैसा कमावणे उद्देश्य असल्याने कामही निकृष्ट होत आहेत. हे शहर लुटण्यासाठी आहे असे समजले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा त्यांनी दिला आहे. भूमिपुत्र कंत्राटदार जगला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. सर्वच काम भूमिपुत्रांना द्यावी असे नाही मात्र छोटी कामे देण्यात यावी असे त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी कोणाकोणाला कामे दिली त्यात त्यांच्या गावाकडील कोण आप्त स्वकीय ,मित्र कोण याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा- नवी मुंबई महापालिकेचा गोवरच्या प्रभाव प्रतिबंधासाठी सर्वेक्षण, लसीकरणावर भर
भूमिपुत्र कंत्राटदारांच्या साठी लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी थेट चर्चा करून तोडगा काढला जाईल असे आश्वासन नाईक यांनी दिले.
विशेष विषय म्हणून बारवी धरणग्रस्तांना नवी मुंबई मनपात कायम नौकरी दिली गेली, मात्र येथील भूमिपुत्र शहरासाठी भूमिहीन झाला. अशांना कायम नौकरीत का समाविष्ट केले जात नाही. असा सवाल आयोजक दशरथ भगत यांनी केला.