उरण : निसर्गाच्या ऋतू बदलानुसार जंगलात पिकणाऱ्या अनेक रानमेव्याची प्रतीक्षा असते. अशाच प्रकारे उन्हाळ्यात येणाऱ्या जांभळाचे आगमन झाले आहे. मात्र या जांभळांना प्रचंड दर आला आहे. जांभूळ सध्या १२० ते १४० रुपये पावकिलो म्हणजे तब्बल ५०० किलो पेक्षा अधिक वर पोहचले आहे. अनेक ठिकाणी जांभूळ हे वाटीच्या मापाने विक्री केली जात आहे. या वाटीच्या मापात ही ५० रुपयांपेक्षा कमी दर नाही.
उन्हाळ्यात साधारणतः आंबा, करवंद,जांभूळसह इतर अनेक प्रकारचे रानमेवे बाजारात येतात. यात करवंद ही वधारली आहेत. त्यामुळे यावर्षी करवंदाच्या वाटीचेही दर चढे आहेत. वाढत्या उन्हाळ्यात या रानमेव्याना मागणी ही असते. साधारणतः २० ते २५ रुपये दरांच्या दरम्यान असलेल्या या रानमेव्यांचा आस्वाद घेतला जात होता. मात्र दरवर्षी रानमेव्याच्या या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक या स्वादापासून वंचित राहू लागले आहेत.
सध्या विकासाच्या नावाने जंगलावर अतिक्रमण सुरू आहे. यात अनेक वर्षांपासून फळ देणारी खास करून रानमेवा असलेले वृक्षही तोडले जात आहेत. तर दुसरीकडे दगड खाणीच्या स्फोटाचाही यात येथील वाढत्या प्रदूषणाचाही परिणाम झाला आहे. प्रदूषणामुळे फळावर मोठ्या प्रमाणात धूळ साचू लागली आहे. बाजारात आदिवासी आणि राज्य भरातून आलेल्या वेगळ्या प्रतीच्या व आकाराच्या जांभळांचे आगमन झाले आहे. यात उरणच्या आसपासच्या खेड्यातून आणि जंगलातून आणलेली जांभल शंभर रुपये पावकिलो आणि एपीएमसी मधून आलेली जांभळे १४० रुपये पावकिलोने विक्री केली जात आहेत.
औषधी आणि गुणकारी
उन्हाळ्यासह अनेक हंगामात येणाऱ्या रानमेव्याना बदलत्या वातावरणात औषधी आणि गुणकारी म्हणून अधिक मागणी असते. मात्र या रानमेव्याचे दर वर्षागणिक वाढू लागले आहेत. यात जांभूळ हे महत्त्वाचे व सध्याच्या परिस्थितीत वाढत्या मधुमेहींसाठी आवश्यक मानले जाते. या आजाराने ग्रस्त नागरिकांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे मागणीतही वाढ झाली आहे. मात्र चढे दर परडवत नसल्याने इच्छा व गरज असतांनाही अनेकांना यापासून वंचित राहावे लावत आहे.