नवी मुंबई : काही लोक जनता दरबार भरवतात. माझा तर दररोज चालता-फिरता जनता दरबार असतो. माझ्या चालत्या फिरत्या दरबारात निवेदन देणाऱ्याच्या पाठीवरच पत्र ठेऊन मी सही करतो. त्यामुळे माझे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून नवी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार असल्याचा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील मेळाव्यात केला.
या निर्धार मेळाव्याला खासदार नरेश म्हस्के, आमदार शरद सोनावणे, उपनेते विजय नाहटा, विजय चौगुले, जिल्हाप्रमुख किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे याच्या उपस्थितीत विष्णुदास भावे नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या निर्धार मेळाव्यात नवी मुंबईतील उबाठा ,काँग्रेस तसेच शरद पवार गटाच्या १३ नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तर गणेश नाईकांवरही जनता दरबारावरून अप्रत्यक्षपणे टोलेबाजी केली.
उबाठावर टीका करताना तिकडे फक्त उठा बसा असते, तर आमच्याकडे थेट धनुष्यबाण सर्वसामान्यांचे थेट काम करतो असा टोला लगावत ‘राजा का बेटा राजा नही बनेगा जो मेहनत करेगा वही राजा बनेगा’ असे सांगितले. सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून जनतेने आपल्याला सिवारले आहे, म्हणूनच एकही दिवस आपल्या प्रवेश झाला नाही असा जात नाही. दररोज पक्षात येणाऱ्यांची रीघ लागलेली आहे. लाडक्या बहीण योजनेवर टीका करतात.
निवडणुकीचा जुमला असल्याची टीका करतात. पण मला सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ म्हणून मिळालेली ओळख सर्वात मोठी आहे. त्यामुळे सत्ता हे साधन नाही साध्य आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नसून राज्याची आर्थिक ताकद वाढेल तशी या योजनेची रक्कमही वाढेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
‘उबाठा’त कार्यकर्त्यांना घरगडी समजतात. येथे कोणीच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही. आमच्याकडे प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान मिळतो. असे म्हणाले. नवी मुंबईत शिवसेनेचा भगवा फडकवावा ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची इच्छा होती. आगामी निवडणूकीत नवी मुंबईकर महायुतीला कल देतील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
हल्ल्याचा निषेध…
शिंदे यांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या पाकीस्तानच्या कृतीला चोख उत्तर देतील असे सांगत पर्यटकांना सर्वस्वी मदत करण्याचे आश्वासन दिले.
लेना नव्हे देना बँक
कंडोनियमअंतर्गत कामांसाठी विशेष निधी देण्याची व्यवस्था करणार असून आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. आमच्याकडे लेना बँक नाही तर देना बँक आहे, असे ते म्हणाले.
तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही….
नवी मुंबईत आमच्या पक्षात येणाऱ्या काही माजी नगरसेवकांच्या बांधकामांना महापालिकेने नोटीसा बजावल्या आहेत. असल्या नोटीसांचे खेळ आम्हाला नवे नाहीत. तुम्ही शिवसेनेत आलात, म्हणजे माझ्या कुटुंबासोबत तुम्ही आहात असे मी समजतो. तुमच्या केसालाही मी धक्का लागू देणार नाही असे शिंदे यावेळी म्हणाले.
प्रवेश
नवी मुंबईतील अविनाश लाड, प्रणाली लाड, सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर ,वैभव गायकवाड, दिव्या गायकवाड ,अंकुश सोनावणे, हेमांगी सानावणे, रंगनाथ औटी, काशीनाथ पवार, भारती कोळी, मेघाली राऊत या माजी नगरसेवकांनी यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. या शिवाय जितेंद्र कांबळी, भारती शिंदे या उबाठाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.