शीव पनवेल महामार्गावर नेरुळ उड्डाण पुलाचे सिमेंट काँक्रीटीकरण काम सुरू असल्याने गेल्या काही आठवड्यापासून वाहतूक कोंडी सोडवता सोडवता वाहतूक पोलिसांच्या नाकी नऊ येत आहेत. शीव पनवेल मुख्य रस्त्यावरील हलक्या वाहने सेवा रस्त्याकडे वळवण्याचे निर्देश देत असताना ते न ऐकता मुख्य रस्त्यावरून गाडी दामटली जात आहे. त्यांना थांबवून कारवाई करावी तर त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शीव पनवेल रस्त्यावर नेरुळ उड्डाण पुलाला समांतर असा एमआयडीसीचा सेवा रस्ता आहे. हा रस्ता पुढे उरण फाट्याला जाऊन मिळतो जो शीव पनवेल मार्गाचा भाग आहे. त्यातच या सेवा रस्त्यावरही दोन्ही बाजूंनी क्रेन आणि जेसीबी मशिन्स पार्क केल्या जात आहेत. तो ही अडथळा ठरत आहे.
शिरवणे पासूनच हलकी वाहने सेवा रस्त्याकडे वळवली तरी नेरुळ उड्डाणपुलाचा पासून ते शीव पनवेल मार्गक्रमण करण्याच्या प्रयत्नात असतात. या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे पुरेसे बळ असूनही बेशिस्त वाहन चालकांच्या मुळे वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी वाहतूक पोलीस प्रयत्नांची शिकस्त करीत असताना त्यांना अशिक्षित वा अल्पशिक्षित ट्रक, कंटेनर , रिक्षा चालक सहकार्य करताना दिसत असून आलिशान गाडीत बसणारे अनेक शिक्षित वाहन धारक मात्र सहकार्य करीत नसल्याचे चित्र आहे. त्यांना अडवले समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता नाना शंका विचारून पोलिसांनाच कायदा शिकवत ऐन रस्त्यात गाडी लावतात हे सुद्धा वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. याच ठिकाणी प्रवासी बस थांबा आहे. त्यामुळे खाजगी गाड्याही थांबतात. ज्या अडथळा ठरत आहेत अशांना समजून सांगण्यात पोलिसांचा वेळ खर्ची पडत आहे. कारवाईत जास्त वेळ लागतो म्हणून समजून सांगत अडथळा दूर करण्यावर आम्ही भर देतो. अशी माहिती एका पोलीस कर्मचाऱ्याने दिली.
मात्र असेही काही वाहन चालक आहेत की ते आपल्या जवळील पाण्याची बाटली स्वतः होऊन पोलिसांना देत मदतीचा हात पुढे करीत आहेत.
या ठिकाणी गर्दीच्या वेळी दिवसभरात एकदा तरी स्वतः वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लांब गाडी पार्क करून येतात . त्यानुसार उपाय केले जात आहेत. सेवा रस्त्यावरून हलकी वाहनांना मार्ग कडून देण्याचा विचार सुरू असून चाचपणी करीत त्यावर अंमल केला जाईल. सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूला पार्क करण्यात येणाऱ्या क्रेन आणि जेसीबी बाबत योग्य ती कारवाई केली जाईल,अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली.