नवी मुंबईतील कोपरी गावात राहणारे देविदास भोईर हे कामानिमित्त सासुरवाडीत गेले होते. हि संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरी केली आहे. चोरट्यांनी दागिने आणि रोकडची शोधाशोध करताना डाळींचे व धान्यांचे डबे हि रिकामे केले, तर दुसरीकडे सोन्याचे बनावट दागिन्यांना मात्र हातही लावला नाही.
हेही वाचा >>> पनवेल: सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू
कोपरी गावात ठाकूर आळी येथे देविदास भोईर हे राहतात. २८ तारखेला ते नेहमी प्रमाणे कामावर गेले तर, त्यांच्या घरातील अन्य सदस्य त्यांच्या पत्नीच्या माहेरी उलवे येथे गेले. त्याच दिवशी संध्याकाळी घरी कोणी नसल्याने देविदास हे आपले काम संपवून पाच वाजता थेट सासुरवाडीला गेले, व रात्री तेथेच सर्वांनी मुक्काम केला. मात्र ३० तारखेला दुपारी ३ च्या सुमारास कोपरीतील घरी काम करणाऱ्या महिलेचा फोन आला व तिने घराचा कडी कोयंडा तोडला असून आतील सामान अस्ताव्यस्त पडले असल्याची माहिती दिली. हि माहिती मिळताच सर्वजण कोपरी येथे आले. घरातील दागिने , रोकड व लॅपटॉप आढळून आला नाही. त्यामुळे चोरट्याने घरात चोरी केल्याचे समोर आले. घरातील वस्तूंची पाहणी केली असता दागिने व लॅपटॉप असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. या बाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात घरफोडीचा गुन्हा नोंद केला आहे.
डाळी आणि धान्यांची डब्यातही दागिन्यांची शोधाशोध
गावठाणात राहणारे जेष्ठ नागरिक आजही दागदागिने धान्यात लपवून ठेवतात हि बाब चोरट्याला माहिती असल्याने त्याने केवळ कपाटच नाही तर डाळी आणि धान्यांची डब्यातही दागिन्यांची शोधाशोध केली . विशेष म्हणजे घरातील कपाटात अनेक सोन्याप्रमाणे दिसणारी बनावट दागिणेही होते मात्र चोराने ती नेली नाहीत. त्यामुळे चोर अट्टल असून पाळत ठेऊन चोरी केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.