नवी मुंबई : उलवे येथील एक सोनार अनेकांचे सोने विविध मार्गांनी घेऊन फरार झाला आहे. आतापर्यंत पाच जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारदारांचे तब्बल सोळा लाख ६९ हजार ५८० रुपयांची फसवणूक केली आहे. यात अजून तक्रारदारांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
विकास जैन आणि महावीर जैन असे फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे स्वर्णशिल्पी नावाची सोन्याची पेढी उलवा सेक्टर २० येथे आहे. या प्रकरणातील फिर्यादी फातिमा मोमीन असून त्यांच्या घरी नातेवाईकाचे लग्न असल्याने त्यांनी ३०.६८० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र २२ नोव्हेंबरला घेतले. मात्र काही दिवसांनी त्या मंगळसूत्रावर हॉलमार्क टाकायचे राहून गेले म्हणून जैन याने मंगळसूत्र परत मागून घेतले. जे आज उद्या करत आजतागायत दिलेले नाही. ५ मार्चला फातिमा पुन्हा गेल्या, पण त्यावेळी दुकान बंद होते. मात्र त्या ठिकाणी इतर काही लोक जमले होते त्यांनाही अशाच पद्धतीने फसवण्यात आल्याचे चर्चेतून समोर आले. अखेर याबाबत एनआरआय पोलीस ठाण्यात विकास आणि महावीर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
यातील तक्रारदार तुषार पवार यांनी २३३ ग्रॅमचा दागिना बनवून घेतला, मात्र त्यात काही बदल करायचा असल्याने तो पुन्हा पेढीत आणून दिला होता. असेच अजय चौधरी यांनी दागिना बनवण्यासाठी १ लाख ९० हजार दोन टप्प्यात दिले होते. अजय भोसले यांनीही २ लाख रुपयांचे दागिने घेतले होते. या दागिन्यांवर हॉलमार्क लावतो म्हणून परत दागिना घेतला होता. तसेच अन्य तक्रारदार साक्षी सिंग यांनी २०.५ ग्रॅम आणि त्यांची बहीण संजना सिह यांचा ३०.५ ग्रॅम वजनाचा, असा दोघींचे मिळून २ लाख ७५ रुपयांचे दागिने जैन याने परत केलेच नाहीत. या शिवाय शहाना राजगुरू यांनी दागिना बनवण्यासाठी ५० हजार रुपये दिले होते.