उरण : जेएनपी प्राधिकरणाकडून मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर येथे कॉर्पोरेट कार्यालयीन इमारतीचा विकास करण्याची घोषणा करण्यात आली आहे. जेएनपी प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि वाढवण बंदर प्रकल्प लिमिटेडचे अध्यक्ष, महासंचालक उन्मेष वाघ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही घोषणा केली.या कॉर्पोरेट कार्यालय इमारतीच्या विकासासाठी जेएनपीएने बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाकडून (एमओपीएसडब्ल्यू) तत्वतः मंजुरी घेतली आहे.

जेएनपीएने ७० लक्ष विक्रमी कंटेनर हाताळणीचा आनंद केक कापून साजरा केला. १७ मार्चला बंदराने ही महत्त्वाची कामगिरी केली. बंदराची उत्कृष्ट कामगिरी कंटेनर हाताळणी करणाऱ्या प्राधिकरणाच्या मेहनतीचे प्रतीक आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनेप प्राधिकरणाचे अध्यक्ष वाघ म्हणाले की वाढवण बंदर यावर्षी आम्ही प्रथमच ७० लक्ष कंटेनर हाताळणीचा टप्पा ओलांडला. हे आमच्या वाढीचे आणि प्रगतीचे प्रतिबिंब आहे. चौथ्या कंटेनर टर्मिनलच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्णत्वा नंतर लवकरच एक कोटीहून अधिक कंटेनर हाताळणी क्षमता असलेले भारताचे पहिले बंदर बनेल.मुंबई बंदर क्षेत्रातील मालेट बंदर कॉर्पोरेट कार्यालयाच्या उभारणीचा निर्णय घेतला असल्याची माहितीही उन्मेष वाघ यांनी यावेळी दिली.

कशी असेल इमारत?

ही इमारत २० पेक्षा जास्त मजल्यांची प्रतिष्ठित उंच असणार आहे. या कार्यालयाची जागा फेरी व्हार्फ आणि डोमेस्टिक क्रूझला लागून असलेल्या मालेट बंदर रोडवर आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने (एमबीपीए) जनेप प्राधिकरणाला दिलेल्या १२,८०४ चौरस मीटर (३.१६ एकर) भूखंडावर ही इमारत उभारण्यात येणार आहे.