उरण : जेएनपीए बंदर विस्थापित ग्रामस्थ अनेक वर्षे लढत आहेत. वाळवीग्रस्त गावाचे पुनर्वसन, मुबलक पाणी आणि आगामी ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर रखरखीत उन्हात ग्रामस्थांचे उपोषण सुरू होते. उरण तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

जेएनपीए बंदराच्या उभारणीसाठी हनुमान कोळीवाडा गाव विस्थापित करून २५६ कुटुंबांचे बोरी पाखाडी येथील १७ हेक्टर जागेऐवजी अवघ्या दोन हेक्टर क्षेत्रावर पुनर्वसन करण्यात आले आहे. या संपूर्ण गावालाच वाळवीने पोखरले आहे. वाळवीग्रस्त गावाचे दुसऱ्या ठिकाणी १७ हेक्टर क्षेत्रावर पुनर्वसन करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा संघर्ष सुरू आहे.

मात्र सरकारकडून वारंवार आश्वासन देत हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची फसवणूक केली जात आहे. याशिवाय गावासाठी ४ इंच व्यासाची १.७ किलोमीटर लांबीच्या टाकण्यात

आलेल्या पाण्याच्या जलवाहिनीमध्ये बिघाड आहे. हा दोष दूर करून मुख्य जलवाहिनीमधून ३५८ नळजोडण्यांना थेट पाणीपुरवठा करण्याची मागणी आहे. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याने आज ग्रामस्थ उपोषणाला बसले होते.

उपोषणस्थळी उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम, उरण पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी भेट दिली. ग्रामस्थांच्या मागण्यांचे निवेदन तातडीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे लेखी पत्र तहसीलदारांनी दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती सुरेश कोळी यांनी दिली.

विस्थापित ग्रामस्थांमध्ये दोन गट

हनुमान कोळीवाडा येथील काही आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थांच्या एका गटाने आंदोलनाला पाठिंबा नसल्याचे पत्रक काढून विरोध दर्शविला. यामुळे आंदोलनात दोन गट पडल्याची चर्चा होती.