उरण : जेएनपीए बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडियादरम्यान सुरू असलेला जलप्रवास फेब्रुवारीपासून जलद होणार आहे. सध्याचा तासाभराचा असलेला हा प्रवास अवघ्या २५ मिनिटांत वातानुकूलित ई स्पीड बोटमधून करता येणार आहे. त्यामुळे उरणकरांना गारेगार प्रवास सुविधा उपलब्ध होणारआहे.
या जलद प्रवासासाठी जादाचे दर आकारले जाणार आहेत. जेएनपीए बंदर ते गेट वे ऑफ या मार्गावरील लाकडी प्रवासी बोटींना सरत्या वर्षात अलविदा करण्याचा निर्णय जेएनपीए संचालक मंडळाने घेतला आहे.नवीन वर्षापासून बंदरातून मुंबईत प्रवाशांना घेऊन जाण्या-येण्यासाठी अद्यायावत स्पीड बोटी धावणार आहेत.
२५ मिनिटांत प्रवास
या प्रदूषणविरहित स्पीडबोटीमुळे २५ मिनिटांत प्रवाशांना जेएनपीएहून मुंबईत पोहचता येणार आहे. याचा फायदा या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्वांनाच होणार आहे. या सागरी मार्गाने जेएनपीएचे कामगार, नातेवाईक, स्थानिक प्रकल्पग्रस्त, कस्टम, एअरफोर्स, सीआयएसएफ, पोर्ट युजर्स आदी कामगारांसाठी वापर करता येत आहे.सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत या मार्गावरून बोटी सुरू असतात.
हेही वाचा >>> Accident News : सुरक्षेसाठी बसवलेली एअरबॅग ठरली जिवघेणी! वाशी येथे अपघातात ६ वर्षीय मुलाचा मृत्यू
प्रदूषणविरहित स्पीड बोटींचा पर्याय
जेएनपीए प्रशासनाने लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेऊन त्याजागी प्रदूषणविरहित इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारला आहे. प्रदूषणविरहीत, सुरक्षित आणि कमी वेळेत मुंबईत ये-जा करण्यासाठी स्पीडबोटींचा पर्याय स्वीकारण्याची संकल्पना जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी अमलात आणण्यासाठी सूचना केली होती. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली असल्याची माहिती जेएनपीएचे उपसंरक्षक कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली. जेएनपीएने १० वर्षाच्या कालावधीसाठी दोन स्पीड बोटींच्या ३७ कोटी ८९ लाख ९४ हजार १९० खर्चाच्या निधीलाही २० डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली असल्याची माहिती जेएनपीएचे विश्वस्त रवींद्र पाटील यांनी दिली.